स्त्री हीच कुटुंबाची मार्गदर्शिका - रश्‍मी शुक्‍ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

पुणे - ‘महिला सुरक्षित असतील तर समाजाची उन्नती होते. त्यांनी आपल्या अधिकारासाठी जरूर आग्रही असावे; मात्र आपले आई-वडील, सासू-सासऱ्यांचा सन्मान राखून कौटुंबिक नातेसंबंध जपावेत. कारण, स्त्री हीच कुटुंबाची मार्गदर्शिका असते,’’ असे मत पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी व्यक्त केले. 

पुणे - ‘महिला सुरक्षित असतील तर समाजाची उन्नती होते. त्यांनी आपल्या अधिकारासाठी जरूर आग्रही असावे; मात्र आपले आई-वडील, सासू-सासऱ्यांचा सन्मान राखून कौटुंबिक नातेसंबंध जपावेत. कारण, स्त्री हीच कुटुंबाची मार्गदर्शिका असते,’’ असे मत पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी व्यक्त केले. 

सकाळ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियाना’अंतर्गत आयोजित केलेल्या ‘तनिष्का जल्लोष’ या दोनदिवसीय उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार या वेळी उपस्थित होते. नगरसेविका राणी भोसले, मंजुश्री खर्डेकर व रूपाली चाकणकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. महिलांसाठी पाककृती, खाद्यपदार्थ व सौंदर्य टिप्स्‌ यांसारख्या विविधांगी माहिती देणाऱ्या स्टॉल्स्‌चे उद्‌घाटन शुक्‍ला यांच्या हस्ते करण्यात आले. 

या उपक्रमांतर्गत स्वयंरोजगाराची माहिती व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सौंदर्याच्या टिप्स, मुलांसाठी किड्‌स कॉर्नर व स्त्री जीवनावर आधारित ‘ती’ची गाणी इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील कृष्णसुंदर गार्डन येथे गुरुवारपर्यंत (ता.२५) ‘तनिष्का जल्लोष’ हा कार्यक्रम चालणार आहे. ‘अमित गायकवाड ग्रुप’ हे या कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक, तर मे. श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हे मुख्य प्रायोजक आहेत. उद्‌घाटनप्रसंगी गायकवाड ग्रुपचे सुरेश कृष्णाजी गायकवाड आणि नगरकर ज्वेलर्सच्या स्वाती आणि वासंती नगरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली फापट यांनी केले. पूनम चोरडिया यांनी आभार मानले.  

स्पर्धा अन्‌ मनोरंजनाचा खजिना
तनिष्का जल्लोष या उपक्रमात महिलांना सायबर क्राइम, व्यक्तिमत्त्व विकास, सौंदर्याच्या टिप्स, एक मिनीट स्पर्धा, अशी माहिती आणि मनोरंजनाचा खजिना अनुभवायला मिळणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील महिलांनी या ‘जल्लोषा’त सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक तनिष्कांनी केले आहे. 

महिलांनी मुलांप्रमाणे मुलींनाही समान दर्जाची वागणूक द्यावी. मुलींना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत; तरच तुम्ही अन्नपूर्णा, सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा आदींच्या भूमिकेत चपखल बसू शकाल.
- रश्‍मी शुक्‍ला, पोलिस आयुक्त

Web Title: pune news tanishka jallosh event