esakal | जुनी सांगवीत कावळ्यांच्या गूढ मृत्यूने पक्षीमित्रांमधून हळहळ

बोलून बातमी शोधा

जुनी सांगवीत कावळ्यांच्या गूढ मृत्यूने पक्षीमित्रांमधून हळहळ
जुनी सांगवीत कावळ्यांच्या गूढ मृत्यूने पक्षीमित्रांमधून हळहळ
sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील पवना नदी किनारा परिसरातील वेताळ महाराज उद्यान परिसरात कावळे मृत्यूमुखी पडत आहेत. या परिसरात गुरुवार (ता.२२) जवळपास वीस ते पंचवीस कावळे मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले. ही बाब कळताच पक्षीमित्र विनायक बडदे सामाजिक कार्यकर्ते विकास भागवत, कुंदन कसबे यांनी उद्यान परिसरात धाव घेतली. उद्यान व नदीकिनारा परिसरात यावेळी जवळपास वीस ते पंचवीस कावळे मृत्यूमुखी पडल्याने त्यांच्या एकाच वेळी इतक्या कावळ्यांचा मृत्यू होणे याबद्दल पक्षी प्राणी मित्रांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कडक उन्हाळा, दुषित पाणी, अन्नामधून विषबाधा की जवळच असलेल्या विद्युत शव दाहिनीच्या सतत सुरू असलेल्या तापमानामुळे कावळ्यांवर हा प्रसंग ओढवला असे तर्क वितर्क प्राणी पक्षी मित्रांकडून ऐकायला मिळाले. मात्र पशुवैद्यकीय विभागाच्या शवविच्छेदनांतरच अहवालानंतरच या गोष्टीचा खुलासा होऊ शकणार आहे.

हेही वाचा: पुण्यात 32 कंपन्यांना हवे कामाच्या ठिकाणी लसीकरण

याबाबत येथील प्राणी पक्षी मित्र विनायक बडदे म्हणाले, तापमान वाढीत कावळा हा पक्षी कुजके अन्नपदार्थ पाण्याजवळ जावून खातो. सध्या नद्यांचे पाणी ही दुषित आहे. यातच तापमानाचा फटका बसून पाण्याच्या कमतरतेमुळे देखील असे होवू शकते. कावळा मनुष्य वस्तीत जवळ वास करतो. यामुळे टाकाऊ अन्नपदार्थातूनही विषबाधा झाली असावी. शहरातील दिघी, देहू या परिसरातही कावळ्यांचे मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दिघीमध्ये १५, देहूमध्ये १० तर जुनी सांगवीत २० ते २५ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार समजताच प्राणी मित्र पक्षी मित्र व सामाजिक कार्यकर्त्यांनी पवना नदी काठावर धाव घेतली. येथील मृत्यू पडलेले काही कावळे कागदी खोक्यात घालून पालिका पशुवैद्यकीय विभागाकडे देण्यात आले.

याबाबत कार्यवाही सुरू असून कावळ्यांचा मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल.यासाठी औंध पशुवैद्यकीय रूग्णालयात सॅंपल पाठवले आहे.

- डॉ.अरुण दगडे पशुवैद्यकीय अधिकारी.

असाच प्रकार नवी सांगवी येथील शनीमंदीर परिसरात काही दिवसांपूर्वी घडला होता.तिथे काही पारवा (पक्षी) मृत्यू मुखी पडले होते. मात्र त्यांचे कारण कळाले नाही.

- विकास भागवत सामाजिक कार्यकर्ते.

सध्या नद्यांचे पाणीही खुप दुषित झालेलं आहे.याचबरोबर याच परिसरात विद्युत दाहीनी स्मशानभूमीत सध्या ताण असल्याने प्रदुषण व तापमान वाढले आहे.याचा फटकाही पक्ष्यांना बसु शकतो. - कुंदन कसबे