थर्माकोल व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

थर्माकोलची मखर व मंदिरे बनवून ती विघटन करण्याचे काम आम्ही २०१४ पासून करत आहोत. आम्ही पर्यावरण जोपासण्यास प्राधान्य देतो. मात्र थर्माकोलचे विघटन होत नाही, असा गैरसमज पसरविला जात आहे. प्रत्यक्षात थर्मोकोलचे विघटन होण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापरही करता येऊ शकतो. 
- कमलेश धार्मिक, थर्माकोल कलाकार

पुणे - राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयास शहरातील थर्माकोल कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांचा पाठिंबा आहे. मात्र या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांसह दहा हजारांहून अधिक कुटुंबाचा विचार व्हावा. थर्माकोलचा पुनर्वापर व विघटनाची जबाबदारी आम्ही घेऊ; मात्र सरकारने आमचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी मागणी या व्यावसायिकांनी केले आहे.

थर्माकोलचा वापर करून गणेशोत्सवात मखर, मंदिरे बनविले जातात. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या थर्माकोल व्यावसायिकांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. वर्षभर कलाकृती बनविण्याचे काम हे व्यावसायिक करतात. सरकारने सध्या प्लॅस्टिकबंदी अंतर्गत थर्माकोल व त्यापासून उत्पादित कलाकृतीवर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. परिणामी, त्यावर अवलंबून असणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता थर्माकोल कलाकार विक्रेता असोसिएशनचे सदस्य कमलेश धार्मिक, शेखर चरवड, हृषीकेश जाधव, सुनील कांचन यांनी व्यक्‍त केली आहे.

थर्माकोल कलाकृती निर्मिती क्षेत्रात चमकी, रंग, टाचणी, लेस, वेलवेट पेपर, वेलवेट पावडर, स्प्रेगन, वाहतूक, असे विविध छोटे-मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. बंदीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

थर्माकोल व्यावसायिकांच्या मागण्या
 थर्माकोलचा पुनर्वापर व विघटनास सरकारने परवानगी द्यावी
 व्यावसायिकांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा
 थर्माकोल विघटन मशिन बसविण्यासाठी सरकारने जागा द्यावी

 शहरातील थर्माकोल व्यावसायिकांची संख्या - २५० 
 थर्माकोल कलाकृतीवर अवलंबित कुटुंब- १० हजारांपेक्षा जास्त.
  एका कलाकाराकडून तयार होणाऱ्या कलाकृती - ५०० ते १०००
 स्वयंरोजगार व लघुउद्योग असल्यामुळे रोजगार निर्मितीस चालना

Web Title: pune news thermocol business issue