महिला स्वच्छतागृहांची संख्या वाढवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

पुणे - महिलांच्या लोकसंख्येच्या तुलनेत शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिका प्रशासनाकडे मंगळवारी केली. भाजी मंडई, बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे असावीत, असेही पक्षाने म्हटले आहे. 

पुणे - महिलांच्या लोकसंख्येच्या तुलनेत शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिका प्रशासनाकडे मंगळवारी केली. भाजी मंडई, बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे असावीत, असेही पक्षाने म्हटले आहे. 

स्वच्छतागृहांअभावी कात्रजमध्ये एका महिलेचा नुकताच मृत्यू झाला. त्याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर जनमानसात खळबळ उडाली. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह महापालिका प्रशासनानेही उपाययोजनांचे सूतोवाच केले. या वृत्ताची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही घेतली आहे. पक्षाचे महापालिकेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिलारे यांच्या नेतृत्वाखाली युवतींनी प्रभारी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, देखभालीसाठी खासगी- सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तुपे यांनी केली. 

दरम्यान, शहरात सध्या 23 हजार महिलांमागे एक स्वच्छतागृह आहे. स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या पुण्यासाठी ही बाब लाजीरवाणी आहे. महिलांच्या संख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहे असावीत. तसेच, असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता नियमितपणे होत नसल्यामुळे महिलांना त्यांचा वापर करता येत नाही, याकडे भिलारे यांनी लक्ष वेधले. उच्च न्यायालयाने स्वच्छतागृहांबाबत स्पष्ट आदेश देऊनही महापालिका त्याचा पाठपुरावा करीत नाही. त्याचा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. त्याची दखल घेऊन आगामी अर्थसंकल्पात याबाबत पुरेशी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी युवती कॉंग्रेसच्या शिवानी माळवदकर, अबोली घुले, अक्षता राजगुरू, अश्‍विनी परेरा, श्रद्धा ठाकूर, तेजवंती कपले, गीतांजली सारगे, स्नेहल शिंगारे आदी उपस्थित होत्या. 

तेली म्हणाल्या, ""महापालिका आयुक्त परदेश दौऱ्यावरून परतल्यावर याबाबत तातडीने धोरण निश्‍चित केले जाईल. दरम्यानच्या काळात क्षेत्रीय कार्यालयांमार्फत स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्ती केली जाईल. नव्या स्वच्छतागृहांबाबतही उपाययोजना सुरू आहेत.''

Web Title: pune news toilet issue NCP