वाहतूक कोंडीचा पीएमपीला फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पुणे - पाऊस आणि शहराच्या मध्य भागात वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे पीएमपीच्या वेळापत्रकावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. सुमारे २० टक्के मार्गांवरील गाड्यांना सध्या उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाली आहे. त्यातच आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सोमवारी शहराच्या मध्य भागात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. मंगळवारी दहावीचा निकाल असल्यामुळे रस्त्यांवर वर्दळ जास्त होती. त्यातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिरात अंगारकी चतुर्थीमुळे शिवाजी रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी होती.

या रस्त्यावर महात्मा फुले मंडई ते महापालिका भवनापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रस्त्यावरून पीएमपीचे सुमारे १७५ मार्ग असून, त्यांच्या १५०० फेऱ्या होतात. मात्र कोंडी झाल्यामुळे बसच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला होता. 

पुणे-सोलापूर रस्ता, टिळक रस्ता, जेधे चौक आदी भागांतही वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे पीएमपीचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यातच पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. परिणामी, रस्त्यांवरून वाहने चालविणे चालकांना अवघड झाले होते. हिंजवडी- निगडी परिसरातील बस मार्गांनाही त्याचा फटका बसला. मध्यवर्ती भागातील कोंडीमुळे पीएमपीच्या सुमारे २० टक्के मार्गांना त्याचा फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहराच्या मध्य भागात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे काही मार्गांवरील बसच्या फेऱ्यांना थोडा उशीर होत आहे. मात्र वाहतूक सुरू ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. उपनगरांतही काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे बसच्या फेऱ्यांना तात्पुरता विलंब होत आहे. पाऊस, वाहतुकीची कोंडी होत असली, तरी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
- सुनील गवळी, वाहतूक महाव्यवस्थापक, पीएमपी

Web Title: pune news Traffic collision hit PMP