सुनावणीनंतरच वृक्षतोड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे - शहराच्या विविध भागांतील ८५० झाडे तोडण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंजुरी दिली असली; तरी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सुनावणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाने आयुक्तांना नुकताच सादर केला आहे. दरम्यानच्या काळात वृक्षतोड होणार नसल्याचेही प्रशासकीय सूत्रांनी रविवारी स्पष्ट केले.

पुणे - शहराच्या विविध भागांतील ८५० झाडे तोडण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंजुरी दिली असली; तरी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सुनावणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाने आयुक्तांना नुकताच सादर केला आहे. दरम्यानच्या काळात वृक्षतोड होणार नसल्याचेही प्रशासकीय सूत्रांनी रविवारी स्पष्ट केले.

शहराच्या विविध भागांतील सुमारे ८५० झाडे तोडण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाने वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सादर केला होता. आयुक्तांनी त्यावर स्वाक्षरी करून त्याला मंजुरी दिली आहे. मात्र, आयुक्तांनी हा निर्णय घेताना वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांना अंधारात ठेवले, असा आक्षेप सदस्यांनी घेतला. प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आग्रह देखील त्यांनी धरला आहे.

या पार्श्‍वभूमीवर ‘झाडे तोडण्याचा जो प्रस्ताव मंजूर झाला आहे, त्याबाबत पुन्हा सुनावणी घेण्यात यावी,’ अशा आशयाचा प्रस्ताव उद्यान विभागाने आयुक्तांना सादर केला आहे. आयुक्तांनी त्याला मंजुरी दिली तर शहरात नियुक्त करण्यात आलेल्या पाच वृक्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वृक्षतोडीच्या प्रस्तावावर सुनावणी घेण्यात येईल, असे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात शहरात वृक्षतोड होणार नाही, असेही सांगण्यात आले.

रस्तारुंदीसाठी वृक्षतोड
बाणेर रस्त्यावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील सुमारे १२ झाडे तोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. ही झाडे तोडल्याचे समजताच परिसरातील प्राधिकरणाच्या सदस्या शिल्पा भोसले; तसेच वृक्षप्रेमी विनोद जैन, वैशाली पाटकर, हर्षद कांबळे, सत्या नटराजन, स्वप्ना नारायण, अखिलेश भंडारी, दिनेश चौधरी आदींनी तेथे धाव घेतली. याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली; तसेच आयुक्तांना पत्रही पाठविले. ‘विद्यापीठ रस्त्यावरील प्राचीन झाडे तोडणे चुकीचे आहे. या पुढील काळात येथे या पद्धतीने अन्य झाडे तोडण्यात येऊ नये; तसेच तोडलेल्या झाडांच्या जागी तातडीने पुनर्रोपण करावे’ असे या पत्रात म्हटले आहे.

३०० झाडांना अभय
शहरात वृक्षतोड करण्यास नऊ महिने न्यायालयाने बंदी घातली होती. सप्टेंबर महिन्यात ही बंदी उठली. दरम्यान, राज्य सरकारने वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत. या कालावधीत वृक्षतोडीचे सुमारे १ हजार १५० प्रस्ताव महापालिकेकडे दाखल झाले होते. त्यातील ३०० ठिकाणची झाडे तोडण्याचा प्रस्ताव तज्ज्ञांच्या समितीने फेटाळला. त्यामुळे ८५० झाडांबाबत प्रक्रिया सुरू आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

यामुळे परवानगी
रस्ते तयार करणे
बांधकाम करणे
पाणीपुरवठा किंवा सांडपाणी वाहिन्या टाकणे
पदपथ- सायकल ट्रॅक उभारणे
धोकादायक झाडे

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण
वृक्षतोडीबाबत उद्यान विभागाचे अधिकारी म्हणाले, ‘‘विद्यापीठ रस्ता रुंद करण्यासाठी काही झाडे तोडण्यास यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानुसार ही झाडे तोडण्यात आली आहेत. याबाबतची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news tree cutting after court decission