"वृक्षरक्षणाय' 

"वृक्षरक्षणाय' 

पुणे - काहीही होत नाही..! म्हणून कारवाईकडे दुर्लक्ष करीत झाड तोडणे आता महागात पडणार आहे. कारण अनधिकृत वृक्षतोड पोलिसांच्या रडारवर आली आहे. असे कृत्य करणाऱ्यांना कायद्यानुसार पाच हजारांपर्यंत दंड किंवा एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होणार आहे. 

धोकादायक, बांधकामांसाठी अडथळा ठरणारे किंवा इतर कोणत्याही कारणाने वृक्षांची तोड करायची असल्यास महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्याने आणि महापालिकेकडूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. अशात पोलिसांकडे तक्रार झाल्यास तीही गांभीर्याने घेतली जात नव्हती. 

महापालिकेची परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास सीआरपीसी 152 व महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 कलम 20 क अन्वये प्रतिबंध करून योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र, नागरिकांनी तक्रार करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. विशेष म्हणजे अधिकार असूनही शहरात पोलिसांकडून एकही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनीच एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. तक्रार आल्यास कारवाई का होत नाही, याची विचारणा वृक्षप्रेमींनी केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी विधी विभागाकडे अभिप्राय मागितला. अधिकाराची जाणीव झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व पोलिस स्टेशनला कारवाईचे आदेश दिले आहेत. 

काय परिणाम होणार 
पोलिसांकडून फौजदारी कारवाई होत नसल्याने शहरात बेकायदा वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा वृक्षतोडीची तक्रार केल्यास पोलिसांकडून त्याची दखल घेण्यात येत नाही, अशी तक्रार नागरिकांकडून होत असते. मात्र, आता पोलिसांकडून कायद्याचा बडगा उचलण्यात येणार असल्याने बेकायदा वृक्षतोडीला बराच आळा बसू शकतो. 

अशी आहे परवानगीची प्रक्रिया 
1) जे झाड तोडायचे आहे त्याच्या छायाचित्रासह क्षेत्रीय कार्यालय किंवा उद्यान विभागात अर्ज केला जातो. 
2) वृक्ष निरीक्षक प्रत्यक्ष पाहणी करून खरोखरच झाड तोडणे गरजेचे आहे याची पाहणी करून तसा अहवाल वरिष्ठ निरीक्षकांना देतो. 
3) गरज वाटल्यास पुन्हा पाहणी करून वरिष्ठ निरीक्षक तसा अहवाल सहायक उद्यान अधीक्षकांकडे देतो. 
3) सहायक उद्यान अधीक्षकांकडून अभिप्रायासह हा अर्ज वृक्ष अधिकाऱ्यांकडे येतो. 
4) वृक्ष अधिकारी आपल्या अभिप्रायासह 6 जणांच्या तज्ज्ञ समितीपुढे हा अर्ज ठेवतो. 
5) प्रत्यक्ष पाहणी, अभिप्रायासह समितीकडून सर्व अर्ज उद्यान विभागात येतात. 
6) महापालिकेचे संकेतस्थळ व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये याबाबतचे जाहिरात प्रकटन प्रसिद्ध करून पुढील 7 दिवसांत हरकती मागविल्या जातात. 
7) जे झाड तोडायचे आहे त्या झाडावर नोटीस लावून 15 दिवसांत हरकती मागविल्या जातात. 
8) हरकत आल्यास सुनावणी घेऊन पुढील निर्णय घेतला जातो. 
9) एकास दहा या नुसार झाडे लावण्याचे बंधन घालून अनामत रक्कम म्हणून प्रतीझाड 10 हजार रुपये भरून घेतले जातात. 
10) त्यानंतर महापालिका आयुक्तांकडून झाड तोडण्यास परवानगी दिली जाते. 

वृक्षसंपदा कमी होतेय? 
1996 मध्ये झालेल्या गणनेमध्ये शहरात सुमारे 25 लाख झाडांची नोंद झाली होती. त्यानंतर 2007 ते 2013 दरम्यान झालेल्या गणनेमध्ये 38 लाख 50 हजार झाडांची नोंद झाली आहे. या तुलनेत झाडांचे प्रमाण वाढलेले दिसत असले तरी गेल्या वीस वर्षांपूर्वी केवळ मध्यवर्ती भागातील झाडांची नोंद झाली होती. मध्यंतरीच्या काळात उपनगरांचा प्रचंड विस्तार होण्याबरोबर काही गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे शहराची वृक्षसंपदा कमी झाल्याचे दिसून येत आहे. 

पुण्यातील वृक्षसंपदा (2013च्या गणनेनुसार) 
38 लाख 50 हजार 
पुण्याची लोकसंख्या (2011च्या गणनेनुसार) 
--- लाख --- 

प्रतिमाणशी झाडाची गरज 
एकास चार 

वृक्षतोडीसाठी 
बेकायदा वृक्षतोडीबाबत गेल्या दोन वर्षात महापालिकेने दाखल केलेले खटले 
550 

अपुरे मनुष्यबळ 
लाखो झाडांची काळजी घेण्यासाठी महापालिकेकडे अधिकारी आणि कर्मचारी मिळून केवळ 27 जणांचे मनुष्यबळ आहे. झाडे तोडण्यास परवानगी देण्यासाठीची पाहणी करण्यापासून बेकायदा वृक्षतोड थांबविण्यापर्यंत सर्वच कामे यांना करावी लागत असल्याने वृक्षसंपदा वाचविण्याबाबत महापालिकाही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. 

अनधिकृत वृक्षतोड आढळल्यास वृक्ष निरीक्षकांकडून तातडीने पंचनामा करून संबंधितांना नोटीस बजावली जाते. गुन्हा करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो. आता सर्व पोलिसांनाही कारवाईचे आदेश मिळाल्याने वृक्षतोडीस आळा बसणार आहे. 
- दयानंद घाडगे, सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण 

बेकायदा वृक्षतोडीबाबत तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. मात्र, आम्ही मागणी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पोलिस स्टेशनला कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बेकायदा वृक्षतोड आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. 
- विनोद जैन, वृक्षप्रेमी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com