आदिवासी विद्यार्थ्यांचे मागण्यांसाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे - गणेशोत्सव आणि गौरी पूजनामुळे शहरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे शिक्षणासाठी गावसोडलेल्या विद्यार्थ्यांवर वसतिगृहातील दुरवस्थेमुळे उपोषण करण्याची वेळ आली आहे. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनी त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मंगळवार (ता.२९) पासून उपोषण करीत आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसांमध्ये सर्व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांनी दिले.

इमारतीच्या दुरवस्थेमुळे निर्माण झालेला धोका, सुरक्षारक्षकच नसल्याने निर्माण झालेला सुरक्षिततेचा प्रश्‍न, सकाळचा नाश्‍ता आणि दोन वेळच्या जेवणाचा निकृष्ट दर्जा, निर्वाह भत्ता वेळेवर न मिळणे, कपड्यांचे पैसे मंजूर होऊनही ते वितरित न करणे आदी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या विद्यार्थिनींना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला.

राज्य सरकारच्या ‘एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प’अंतर्गत राज्यभरात आदिवासी मुले आणि मुलींसाठी वसतिगृहे उभारण्यात आली आहेत.

त्यापैकी काही वसतिगृहे चांगल्या स्थितीत आहेत, तर बहुतांश वसतिगृहे भाडेतत्त्वावर इमारतीमध्ये आहेत. पुण्यात सोमवार पेठ, आकाशवाणी हडपसर, मगरपट्टा, भोसरी, येवलेवाडी, केशवनगर, मांजरी आणि शेवाळवाडी अशी एकूण ११ आदिवासी वसतिगृहे आहेत. येथील आदिवासी मुले आणि मुलींच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड देत शिक्षण घ्यावे लागत आहे.

या संदर्भात तक्रारी करण्यास गेल्यानंतर गृहपालांकडून विद्यार्थ्यांना हीन वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केल्या. या संदर्भात वसतिगृहांचे गृहपाल, घोडेगाव आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि नाशिक येथील आदिवासी आयुक्तांपर्यंत पत्रव्यवहार करूनही या समस्या सोडविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून मगरपट्टा येथील वसतिगृहामध्ये विद्यार्थी उपोषणास बसले आहेत.

आदिवासी वसतिगृहात तातडीने २४ तास सुरक्षारक्षक नेमण्याबरोबरच नाश्‍ता आणि जेवणाची गुणवत्ता सुधारण्यात येईल. तसेच निर्वाह भत्ता आणि कपडा भत्त्याची मंजूर रक्कम थेट बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. सोमवार पेठ आणि मगरपट्टा आदिवासी वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी दोन्ही वसतिगृहातील गृहपालांकडून लेखी अहवाल घेतले जातील. तरी विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करत आहे.
- रामचंद्र सोनकवडे, एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग, घोडेगाव

Web Title: pune news tribal student fasting for demand