ट्रक ‘बॉडी बिल्डिंग’च्या व्यवसायाला उतरती कळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

पुणे - ट्रक उत्पादक कंपन्या पूर्वी वाहनाची पूर्ण बांधणी करण्याऐवजी केवळ ‘चॅसी’ तयार करीत असत. त्यावर ‘बॉडी’ बांधण्याचे काम बाहेरील गॅरेजमध्ये होत असे. आता कंपन्यांनीच ही सगळी कामे करण्यास सुरवात केल्यामुळे संबंधित गॅरेज लुप्त होऊ लागली आहेत. कात्रज परिसरात असे सुमारे शंभर व्यावसायिक होते; पण काम मिळणे कमी होत गेल्याने सध्या जेमतेम २० ते २५ गॅरेज कसेबसे अस्तित्व टिकवून आहेत. 

कात्रज, मांगडेवाडी, कोंढवा रस्ता, दत्तनगर, आंबेगाव या भागात नवीन ट्रकच्या ‘बॉडी’ बांधणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता. त्यांचा लौकिक चांगला असल्याने राज्यभरातील अनेक मालवाहतूकदार ट्रक बॉडीच्या बांधणीचे काम करून घेण्यासाठी येथे येत. या मुख्य कामाखेरीज वाहनांची रंगरंगोटी, ‘पाट्या’ची देखभाल-दुरुस्तीही येथे करून मिळत असे. प्रत्येक व्यावसायिकाला काही वर्षांपूर्वी ‘ट्रक बॉडी’ची किमान दहा कामे मिळत असत; पण हल्ली वर्षाला एखाद-दुसरेच मोठे काम मिळते, असे या क्षेत्रातील ‘श्री बालाजी बॉडी बिल्डर्स’चे चालक संजय क्षीरसागर यांनी सांगितले.

व्यावसायिकांचे स्थलांतर
पूर्वी टाटा मोटर्स (तत्कालीन ‘टेल्को’) आणि अशोक लेलॅंड या दोन मुख्य कंपन्या ट्रक उत्पादनात होत्या. वाहन खरेदीसाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नोंदणी होत असे. तिची पूर्तता वेळेत व्हावी, यासाठी या कंपन्या ट्रकचे फक्त इंजिनिअरिंगशी निगडित काम- म्हणजे इंजिन, मूळ ‘बॉडी’ आणि प्राथमिक अवस्थेतील ड्रायव्हर केबिन एवढेच बनवून देत.

ट्रकग्राहकांना उर्वरित ‘बॉडी’ बांधणीचे काम बाहेर करून घ्यावे लागत असे. आता ट्रक निर्मितीत अनेक देशी-विदेशी कंपन्या उतरल्या आहेत. बव्हंशी कंपन्या स्वतःच ट्रकची पूर्ण बॉडी बनवून देऊ लागल्या आहेत. यामुळे शहर परिसरातील ट्रकच्या ‘बॉडी’ निर्मितीचा व्यवसाय शेवटच्या घटका मोजू लागला आहे. त्यामुळे अनेकांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. 

Web Title: pune news truck body building business