तुकाईदर्शन रस्त्यावर जड वाहतूक सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

फुरसुंगी - वाहतूक पोलिस उपायुक्तांनी तुकाईदर्शन रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश देऊनही या रस्त्यावर सर्रास जड वाहतूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाहतूक पोलिसांदेखत तुकाईदर्शन रस्त्यावर दिवसभर जड वाहतूक सुरू असते, तरीही पोलिस कारवाई करत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिकांनी केली आहे. याबाबत वाहतूक विभागाशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. 

सासवड रस्ता ते तुकाई टेकडी या रस्त्याची रुंदी फक्त पंधरा फूट आहे. एका बाजूला ग्लायडिंग सेंटरची लांब भिंत आणि दुसऱ्या बाजूला रहिवासी इमारती, दुकाने यांच्या कात्रीत सापडलेल्या तुकाईदर्शन रस्त्यावर क्षमतेपेक्षा तिप्पट वाहतूक सुरू आहे. महापालिका हद्दीतील काळेपडळ, ससाणेनगर, सय्यदनगर, चिंतामणीनगर व फुरसुंगीच्या ढमाळवाडी, पापडेवस्ती, तुकाईदर्शन भागातील नागरिकांना सासवड रस्ता, हडपसर, सोलापूर रस्ता या ठिकाणी जाण्यासाठी तुकाईदर्शन हा एकमेव रस्ता असून, येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि अपघात होऊ नये, म्हणून नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार शहर वाहतूक विभागाने हा रस्ता पहाटे पाच ते रात्री दहा या वेळेत जड वाहतुकीसाठी बंद करण्याचा लेखी आदेश दिला होता. 

पोलिस चौकीसमोरूनच वाहतूक 
वाहतूक उपायुक्तांच्या आदेशानंतरही ट्रक, ट्रॅक्‍टर, पाण्याचे टॅंकर, वाळूचे ट्रक व अन्य जड वाहतूक सुरूच आहे. तुकाईटेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पोलिस चौकीसमोरूनच जड वाहतूक सुरू असते. तसेच सत्यपूरम चौकात दिवसभर थांबणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत ही जड वाहतूक सुरू आहे. नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

वेळीच कारवाई करण्याची मागणी 
जड वाहतुकीने आम्हाला पायी चालणेदेखील असह्य झाले आहे. टॅंकरचे पाणी रस्त्यावर सांडून रस्ता निसरडा होतो. त्यामुळे अनेक जण घसरून पडतात. याची दखल घेऊन येत्या आठ दिवसांत येथील जड वाहतूक पूर्णतः बंद करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित रासकर, लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संदीप हरपळे, श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संजय देशमुख, अजित झेंडे, डॉ. शंतनू जगदाळे आदींनी केली आहे.

Web Title: pune news tukaidarshan traffic issue