भाजीपाल्याचे भाव दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

शेतकऱ्यांच्या संपामुळे मार्केट यार्ड येथील आवकेत नव्वद टक्के घट

शेतकऱ्यांच्या संपामुळे मार्केट यार्ड येथील आवकेत नव्वद टक्के घट

पुणे - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम दिसू लागले असून, मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारातील आवक ९० टक्‍क्‍यांनी घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले आहेत. त्याची झळ सर्व सामान्य नागरिकांना बसू लागली आहे. भावातील वाढ आणि आवक कमी होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांनीदेखील बाजाराकडे पाठ फिरविली आहे. 
गुरुवारी शेतकऱ्यांच्या संपाला सुरवात झाली. तुलनेत संपाच्या दिवशी घाऊक बाजारातील आवक मोठ्या प्रमाणावर घटली. शुक्रवारी घाऊक बाजारात केवळ दहा ट्रक इतकी भाजीपाल्याची आवक झाली. त्यामुळे बहुतेक मालाचे भाव दुप्पट झाले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड, पिंपरी, मोशी, उत्तमनगर, खडकी आणि मांजरी येथील उपबाजारातील आवकही लक्षणीय प्रमाणात घटली आहे. 

शुक्रवारी मिरची, भुईमूग शेंग यांची आवक बरी झाली. नाशवंत माल असल्याने पालेभाज्या, फळभाज्यांची साठवणूक जास्त दिवस करता येत नाही. तुलनेत कांदा, बटाटा, लसूण हे जास्त दिवस टिकू शकतात. त्यामुळे त्याची बाजारातील उपलब्धता आहे; परंतु संप आणखी काही दिवस चालला तर त्याचाही तुटवडा निर्माण होऊ शकतो. उद्या (शनिवारी) घाऊक बाजाराला साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे शुक्रवारी साधारणपणे १०० ट्रकच्या आसपास भाजीपाल्याची आवक होत असते. 

गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसांत आवक कमी झाली आणि शनिवारी आवक होण्याची शक्‍यताच नाही. यामुळे शहरांतील भाजीपाला पुरवठ्याची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. 

फळ बाजारातील उलाढाल मंदावली
फळ बाजारातील उलाढाल ८० टक्‍क्‍यांनी घटली आहे. फळ बाजारात शेतकरी मालाचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांच्या आसपास असते. सध्या शेतकरी आणि व्यापारी मालाची आवक कमी झाली असून, विशेषतः स्थानिक आंब्याच्या हंगामाला त्याचा मोठा फटका बसला आहे. सध्या रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. यासाठी कलिंगड, खरबूज, पपई आदी फळांना मागणी वाढते. आवकच थांबल्याने त्याचे भाव वाढले आहेत. शुक्रवारी शिल्लक मालाचे लिलाव झाले. लिंबाची आवक केवळ १५० गोणी इतकी झाली. ही प्रतिदिन सरासरी दोन ते अडीच हजार गोणी इतकी होत असते. या प्रतिगोणीचा भाव ४०० ते १२०० रुपयांपर्यंत पोचला आहे.

नागरिक, विक्रेत्यांना फटका
बाजारातील आवक घटल्याने स्वाभाविकपणे भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले. त्यामुळे ग्राहकांना जादा पैसे मोजण्याची वेळ येत आहे. वाढलेले भाव आणि आवक कमी असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजाराकडे पाठ फिरविली. गुरुवारी किरकोळ विक्रेत्यांनी काही प्रमाणात मालाची खरेदी केली होती. त्यांच्याकडेही साठवणुकीच्या मर्यादा असल्याने पुरवठा जास्त दिवस करू शकत नाही. घाऊक बाजारातही आवक नसल्याने शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. जास्त भावांत माल खरेदी केला आणि तो ग्राहकाने खरेदी केलाच नाही तर नुकसान होण्याची भीतीही किरकोळ विक्रेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक अत्यल्प झाली. कोथिंबीर, मेथी यांच्या जुडीला ३० रुपये इतका भाव मिळाला. 

Web Title: pune news vegetable rate double