सावधान..! ‘व्हायरस इनसाइड’

सावधान..! ‘व्हायरस इनसाइड’

पुणे - व्हायरस किंवा मॅलवेअरमुळे संगणक किंवा मोबाईलमधील संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती चोरी होण्याच्या घटना, प्रकार आपण ऐकले, वाचले, पाहिले असतील. बहुतांश घटना या ग्राहकांनी म्हणजेच ‘एंड युजर’ने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे घडतात. आता मात्र एक नवा प्रकार उघडकीस आला आहे ज्यामध्ये संगणकाचा मेंदू असलेल्या ‘मायक्रोप्रोसेसर’मध्येच व्हायरस आढळला आहे. इंटेल कंपनीने १९९५ नंतर बनविलेल्या ‘प्रोसेसर’मध्ये ‘मेल्टडाउन’ आणि ‘स्पेक्‍टर’ नावाचे दोन व्हायरस आढळले आहेत. 

‘मेल्टडाउन’ हा व्हायरस वापरकर्त्याला उपलब्ध असलेल्या ‘सिस्टिम मेमरी’चा अनुचित वापर करतो; तर ‘स्पेक्‍टर’ हा एका ॲप्लिकेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या मेमरीचा वापर दुसऱ्याच ॲप्लिकेशनसाठी करण्यास मदत करतो. याचा फटका इंटेल, एएमडी आणि एआरएम प्रोसेसर्सला बसला आहे. या दोन्ही व्हायरसमुळे संगणकाचा काम करण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे तुम्ही जर इंटेल, एएमडी, एआरएक्‍स, कोरटेक्‍स-ए प्रोसेसरवर चालणाऱ्या मायक्रोसॉफ्ट, लिनक्‍स, मॅक किंवा अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असाल तर तुम्हाला हा अनुभव आला असण्याची शक्‍यता आहे. पर्सनल कॉम्प्युटर वापरणाऱ्यांसह मोठी डेटा सेंटर चालविणाऱ्यांनाही या व्हायरसचा फटका बसला आहे. ‘रेड हॅट’ने केलेल्या पाहणीत संगणकांच्या क्षमतेवर दहा ते वीस टक्के परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे.  

मेल्टडाउन व स्पेक्‍टर या व्हायरसवर मात करण्यासाठी आता सिक्‍युरिटी अपडेट्‌स आले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम ऑटोमॅटिक अपडेट्‌सचा पर्याय ‘ऑन’ ठेवा. संगणक प्रणाली विकसकांनी बाजारात उपलब्ध करून दिलेल्या सर्व ‘सिक्‍युरिटी पॅच’चा वापर करा. तसेच त्यांच्याकडून जारी करण्यात येणाऱ्या अपडेट्‌सचा वापर करा. गेल्या दोन आठवड्यांतील या घडामोडींमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. नवीन मोबाईल फोन विकत घेण्यास लोकांना भाग पाडण्यासाठीचे हे कारस्थान आहे, या प्रचारापासून ते इंटेलच्या शेअरच्या किमती घसरण्यापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यात भर पडली ते ‘इंटेल’ने या प्रकरणावर साधलेल्या मौनामुळे. ऑस्ट्रिया देशातील एका शहरात तीन संशोधकांनी इंटेल प्रोसेसरमधील ही सुरक्षेची त्रुटी मागील महिन्यात शोधून काढली होती. त्यानंतर त्यांनी इंटेलशी याबाबत संपर्क साधला, मात्र त्याबाबत योग्य स्पष्टीकरण देण्याऐवजी इंटेलने एक आठवड्याच्या कालावधीनंतर हा आरोप खोडून काढण्यात वेळ घालविला. विशेष म्हणजे इंटेलने या संशोधकांना सांगितले की, या त्रुटीबद्दल माहिती देणारे ते चौथे होते. या उत्तरामुळे खरे म्हणजे भीती अधिक वाढली आहे. प्रोसेसरमधील या त्रुटीबद्दल माहिती असलेले किती लोक आहेत, त्यांना कधीपासून ती माहिती आहे, किती युजर आतापर्यंत बळी पडले आहेत आणि त्याचा किती प्रमाणात गैरफायदा घेऊन झाला आहे, हे अद्यापही गुलदस्तातच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com