"ताज'मध्ये घुसणे परीक्षाच होती - नांगरे पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नांगरे पाटलांच्या विद्यार्थ्यांसाठी टिप्स... 
- स्वतःच्या क्षमता ओळखा. 
- आपले ध्येय निश्‍चित करा. 
- स्वतःची वेगळी शैली विकसित केली पाहिजे. 
- वेळेचे योग्य नियोजन. 
- विषयांची आवड जोपासा. 

पुणे - ""एके 47, हॅण्ड ग्रेनेड, आरडीएक्‍स यांसारख्या साधनांनी सज्ज अतिरेकी माझ्या समोर निर्दोष लोकांना मारत होते. अशा वेळी स्वतःचा विचार करत बसणे मला जमलेच नाही. कोणताही दुसरा विचार न करता मी सहकाऱ्यांसोबत थेट "ताज'मध्ये घुसलो. त्या क्षणी तो वेडेपणा, आत्महत्या असेल कदाचित; पण माझ्यासाठी ती माझ्या आयुष्यभराच्या तालमीची परीक्षाच होती,'' अशा शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी आपले अनुभव सांगितले. 

अक्षरधारा, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 55व्या दीपावली शब्दोत्सवाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी पाटील यांच्याशी संवाद साधला. या वेळी महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर, राजहंस प्रकाशनचे सदानंद बोरसे, मांडके हिअरिंगच्या डॉ. कल्याणी मांडके आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ""मुंबईमधील त्या हल्ल्याच्या वेळी समोर जे वाईट घडतंय ते थांबविण्याच्या उत्कट इच्छाशक्तीमुळेच मी ते धाडस करू शकलो. त्या ठिकाणचा पूर्वअभ्यास आणि सदसद्विवेकबुद्धी यांच्या जोरावरच अतिरेक्‍यांचा सामना करत "नेवल कमांडो' येईपर्यंत अतिरेक्‍यांना थांबवून ठेवता आले.'' 

गुप्तचर विभागाच्या अतिरेकी हल्ल्यांच्या सूचनेकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत खंत व्यक्त करत, यापुढील काळात पोलिस खात्यात रचनात्मक आणि सकारात्मक बदल घडविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: pune news Vishwas Nangare Patil