'वॉटर एटीएम' अल्पावधीतच बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पुणे कॅंटोन्मेंटमधील स्थिती; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये 'पाण्यात'

पुणे कॅंटोन्मेंटमधील स्थिती; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये 'पाण्यात'
पुणे - कॅंटोन्मेंटमधील नागरिकांना शुद्ध पाण्याची हमी देत प्रशासनाने बसविलेल्या "वॉटर एटीएम' अल्पावधीतच बंद पडले आहे. याच्या देखभाल-दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नव्याने बसविलेले "वॉटर एटीएम'ही सुरू करण्याची तसदी कॅंटोन्मेंट प्रशासन घेत नसल्याची सद्यस्थिती आहे.

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांच्याकडून "वॉटर एटीएम' बसविण्याचे सुचविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्या पुढाकारामुळे कॅंटोन्मेंटच्या विविध भागांमध्ये पाच "वॉटर एटीएम' बसविण्यात आली. उद्‌घाटन होईपर्यंत काही "वॉटर एटीएम' सुस्थितीत होते, त्यानंतर काही दिवसांनीच ती बंद पडली आहेत.

एका "वॉटर एटीएम'ची संपूर्ण यंत्रणा, पाण्याची टाकी आणि वीज मीटरसाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. गुजरात येथील "पिरामल सर्वजल' कंपनीकडून आत्तापर्यंत पाच ठिकाणी ही यंत्रणा बसविली आहे. एक-दोन वगळता अन्य यंत्रणा बंद आहेत. तक्रार केल्यानंतरही त्याची दुरुस्त केली जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

वर्दळीच्या ठिकाणाकडेच दुर्लक्ष
हिंद तरुण मंडळ, श्रीकृष्ण चौकातील श्रीकृष्ण मंडळ, आझम कॅम्पसच्या पाठीमागील बाजूस, महात्मा गांधी बस स्थानक आणि वानवडी परिसर अशा पाच ठिकाणी "वॉटर एटीएम' बसविले असून, आणखी तीन ठिकाणी बसविले जाणार आहे. त्यापैकी हिंद तरुण मंडळ व आझम कॅम्पस येथील "वॉटर एटीएम' सुस्थितीत असून, त्याचा वापर नागरिक करत आहेत. नागरिकांची वर्दळ असलेल्या श्रीकृष्ण चौक, महात्मा गांधी बस स्थानक यांसारख्या अन्य ठिकाणचे "वॉटर एटीएम' मात्र बंद पडली आहे.

श्रीकृष्ण चौकातील "वॉटर एटीएम'ला उद्‌घाटनावेळी तात्पुरती वीज घेण्यात आली होती. कायमस्वरूपी वीज मीटर घेण्याच्या प्रक्रियेमुळे काही दिवस यंत्रणा बंद होती. यंत्राच्या अंतर्गत भागातील दुरुस्ती करायची आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित कंपनीचे अभियंते येऊन दुरुस्त करतील.
- प्रियांका श्रीगिरी, सदस्य, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

Web Title: pune news water ATM close