पाणीपुरवठा करणार; पण थकबाकीचे काय?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

ग्रामपंचायतींकडे महापालिकेचे सुमारे ३२ कोटी थकीत

पुणे - हद्दीलगतच्या केशवनगर, साडेसतरानळी, महादेवनगर- मांजरी ग्रामपंचायतींना महापालिकेकडून येत्या चार दिवसांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे. मात्र, हद्दीलगतच्या १६ ग्रामपंचायतींकडे महापालिकेची पाणीपट्टीची सुमारे ३२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तिच्या वसुलीसाठी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेणार ? याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.  

ग्रामपंचायतींकडे महापालिकेचे सुमारे ३२ कोटी थकीत

पुणे - हद्दीलगतच्या केशवनगर, साडेसतरानळी, महादेवनगर- मांजरी ग्रामपंचायतींना महापालिकेकडून येत्या चार दिवसांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे. मात्र, हद्दीलगतच्या १६ ग्रामपंचायतींकडे महापालिकेची पाणीपट्टीची सुमारे ३२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तिच्या वसुलीसाठी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेणार ? याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.  

केशवनगर, साडेसतरानळी, महादेवनगर- मांजरी ग्रामपंचायतींना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकताच मंजूर झाला. आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक उमेश गायकवाड यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. हद्दीलगत पाच किलोमीटर अंतरावरपर्यंत महापालिका पाणीपुरवठा करू शकते. त्यासाठी ग्रामपंचायतींनी मागणी केल्यावर महापालिका त्यांना नळजोड देते. ग्रामपंचायतींनी महापालिकेकडून मिळालेले पाणी टाकीत साठवून जलवाहिन्यांद्वारे त्याचा पुरवठा करायचा आहे. तसेच नळजोडाच्या प्रमाणात महापालिकेला त्याचे नियमितपणे बिल देणे अपेक्षित आहे; परंतु काही ग्रामपंचायतींनी पाण्याची टाकी बांधून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची यंत्रणाच कार्यान्वित केलेली नाही.

तसेच काही ग्रामपंचायती महापालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पाण्यापोटी नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करतात; परंतु तिचा भरणा महापालिकेकडे करीत नाहीत. तर काही ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टी वसूल करण्यासाठी कर्मचारी नाहीत, असे महापालिकेकडील नोंदीतून आढळले आहे. 

हद्दीलगत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी द्यावे, यासाठी लोकप्रतिनिधी महापालिकेवर दबाव आणतात. परिणामी, महापालिकेला पाणी द्यावे लागत आहे. तसेच महापालिका हद्दीलगत जलवाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोड घेण्यात आले आहेत. त्यावरही महापालिकेला कारवाई करताना मर्यादा येत असल्याचे या पूर्वीच उघडकीस आले आहे.

पाठपुरावा सुरू आहे - प्रशासन 
याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, ‘‘पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतींकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी त्यांना नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. तसेच लोकअदालतीमध्येही उपस्थित राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. वसुलीसाठी त्यांच्याशी सातत्याने पत्र व्यवहारही सुरू आहे,’’ असे सांगण्यात आले. 

गावांची थकबाकी 
लोहगाव २ कोटी १० लाख, बावधन २५ लाख ७२ हजार, सूस ७ लाख १५ हजार, वाघोली १ कोटी ६५ लाख, केशवनगर २ कोटी ७ लाख, उंड्री १२ लाख ८२ हजार, साडेसतरा नळी ५३ हजार २६८, नऱ्हे २ कोटी १६ लाख, धायरी ४ कोटी ९० लाख, नांदेड ३ कोटी ५० लाख, किरकटवाडी २ कोटी १५ लाख, खडकवासला ४ कोटी ६१ लाख, आंबेगाव बुद्रुक २ कोटी १३ लाख, महादेवनगर २ कोटी ९४ लाख.  

Web Title: pune news water supply arrears issue