पाणीपट्टीची थकबाकी 502 कोटींवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे  - महापालिकेच्या पाणीपट्टीची थकबाकी आता 502 कोटी रुपयांवर पोचली आहे. मिळकतकरात 15 टक्के वाढ करून नागरिकांकडून 130 कोटी रुपये वसूल करण्याचा प्रशासनाने प्रस्ताव मांडला असताना, पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यावर भर दिला जाणार का?, असा प्रश्‍न महापालिका वर्तुळात उपस्थित झाला आहे. तसेच, सध्या असलेल्या मीटर पद्धतीमध्ये सुमारे 49 टक्के मीटर बंद आहेत. 

शहरात आठ लाख 20 हजार कुटुंबांना पालिकेचा नळजोड प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दिला आहे, तर व्यावसायिक वापरासाठीचे पाणी सुमारे 43 हजार मीटरद्वारे पुरविले जाते. महापालिकेचे उत्पन्न घटत असल्यामुळे यंदा 500 कोटी रुपयांनी अर्थसंकल्पाचा आकार कमी केला. मात्र, प्रशासनाने मिळकतकरात 15 टक्के वाढ सुचविली आहे. त्याचे 130 कोटी रुपये वसूल होतील, असे गृहीत धरून आयुक्त कुणाल कुमार यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र, पाणीपट्टीची थकबाकी वसूल झाली तर मिळकतकरात वाढ करावी लागणार नाही, असे अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यातच पाणीपट्टीत यंदाही सुमारे 15 टक्के वाढ झाली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांमध्ये जिल्हाधिकारी, रेल्वे, विमानतळ आदी विविध खात्यांकडे 45 कोटींपेक्षा अधिक रक्कम, तर महापालिका लगतच्या ग्रामपंचायतींकडे सुमारे 30 कोटी रुपये थकबाकी आहे. महापालिका प्रशासनाने गेल्या आर्थिक वर्षांत थकबाकी वसुलीसाठी तीन वेळा लोकअदालत भरविली होती. त्यातून आठ कोटी रुपये वसूल झाले होते. मात्र, दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर, झोपडपट्ट्यांतील पाणीपट्टी, रस्ता रुंदीकरणातील पाणीपट्टीची थकबाकी आदींमुळे ही आकडेवारी फुगल्याचे दिसत आहे. बिल दुरुस्तीनंतर वसुली होणारी रक्कम सुमारे 25 टक्के आहे. 

येत्या आर्थिक वर्षात शहरातील अनधिकृत नळजोड शोधून त्यावर कारवाई होणार आहे. तसेच लोकअदालतीचे आयोजन करून पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. थकबाकीबाबत 1200 नळजोडधारकांना कारवाई करण्याची नोटीस बजावली असून, त्यांच्याकडूनही वसुलीसाठी कार्यवाही सुरू आहे. 
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका 

Web Title: pune news water tax pmc