32 लाख 40 हजार शेतकरी गेले कोठे?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कर्जमाफी अर्जांच्या छाननीदरम्यान सहकार विभागाची माहिती

कर्जमाफी अर्जांच्या छाननीदरम्यान सहकार विभागाची माहिती
पुणे - राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'अंतर्गत अर्जदारांची संख्या निश्‍चित झाली आहे. एकूण 56 लाख 59 हजार 187 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. या योजनेचा लाभ 89 लाख कर्जदारांना होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते; पण प्रत्यक्षात अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटल्याने उर्वरित 32 लाख 40 हजार 813 शेतकरी गेले कोठे? याचा शोध कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेतला जाणार आहे. याप्रकरणी बॅंका व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.

या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी 17 सप्टेंबरपर्यंत मुदत होती. त्यामध्ये वाढ करून 22 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत एक कोटी पाच लाख 12 हजार 40 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 56 लाख 59 हजार 187 शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. राज्य सरकारने या योजनेचा लाभ 89 लाख कर्जदारांना मिळणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात अर्जदारांची संख्या कमी असल्याने त्यामागील कारणमीमांसा केली जाणार असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

34 हजार कोटींची आवश्‍यकता नाही
राज्य सरकारने 89 लाख शेतकरी आणि त्यांच्यासाठी सुमारे 34 हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटल्याने हा आकडा कमी होण्याची शक्‍यता असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यभरातील अर्जांची छाननी करण्यासाठी सुमारे साडेतीन हजार लेखापरीक्षकांची नियुक्त केली आहे. संगणकीकृत पद्धतीने अर्ज छाननी, लेखापरीक्षण करून योग्य लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला जाईल.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

Web Title: pune news where is farmer