'गोखले कोण' म्हणणारे तुम्ही कोण? - अभिनेते विक्रम गोखले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पुणे - 'सांस्कृतिक, सामाजिक विषयांबरोबरच राजकीय विषयावरही बोलण्याचा अधिकार आहे. तो मला घटनेने दिला आहे; पण देशहिताबद्दल, अन्याय करणाऱ्यांविरोधात बोललो म्हणून "हे गोखले कोण' असा प्रश्‍न तुम्ही विचारता. लोकशाही देशात बोलायचेच नसेल तर मला प्रश्‍न विचारणारे तुम्ही कोण?'', असा प्रतिप्रश्‍न अभिनेते विक्रम गोखले यांनी केला. देशाच्या विरोधात बोलणे हा देशद्रोहच आहे. माझ्या देशात राहून भारत मुर्दाबाद म्हणायचे आणि हिरवे झेंडे घेऊन पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणा द्यायच्या, अशांना फाशीच दिली गेली पाहिजे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना फाशी द्या, असे विधान गोखले यांनी पुण्यात केले होते; पण फाशी द्या, असे म्हणण्याचा अधिकार गोखले यांना कोणी दिला? असा सवाल काहींनी उपस्थित केला. हा धागा पकडून गोखले यांनी टीकेला उत्तर दिले. क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानचा "जीवनगौरव पुरस्कार' गोखले यांना ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, अभिनेते सुव्रत जोशी यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित केले.

गोखले म्हणाले, 'सैनिकांवर दगडफेक होते तरी ते उत्तर देत नाहीत, हीच सहिष्णुता आहे. तरीही तुम्ही सैन्यदल आणि देशात असहिष्णुता आहे म्हणता आणि पुरस्कार परत करता. खरंतर तुम्हाला पुरस्कार द्यायला नको होते. देशात सहिष्णुता आहे; पण देशविरोधी बोलणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो. अशा लोकांनी देश सोडूनच जायला हवे. यांच्यावर टीका केल्याबद्दल अनेकांनी माझ्यावरच टीका केली. ती पटली नाही; पण माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी "प्रकाशात असणाऱ्यांनी संताप आवरायला हवा', ही केलेली सूचना पटली.''

लेले म्हणाले, 'साने यांच्या नावाचा हा पुरस्कार त्यांच्या आशीर्वादासमान आहे.'' महापौर मुक्ता टिळक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ साने, कार्यवाह सुनील नेवरेकर उपस्थित होते. संजय गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे-मुंबईसह देशात बेशिस्तीचे वातावरण आहे, हे पाहून त्रास होतो. खरंतर गोखले घराण्यातील लोकांना संताप येतो; पण सध्या मी संताप आवरला आहे. पूर्वीचा संतापी असतो तर बेशिस्त लोकांना मारलेच असते. संताप आवरल्याने विचार करू शकतो.
- विक्रम गोखले, अभिनेते

Web Title: pune news Who are you saying 'Gokhale'?