‘वायफाय’चा ४० लाख प्रवाशांकडून वापर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

पुणे - मनोरंजनासाठी एसटी महामंडळाने एसटी गाड्यांमध्ये बसविलेल्या वायफाय सुविधेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दररोज सुमारे चाळीस लाखांहून अधिक प्रवासी या सुविधेचा फायदा घेत असून, त्यामध्ये सर्वाधिक मराठी चित्रपट पाहण्यास प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. वाढता प्रतिसाद बघून एसटी महामंडळाने सर्वच गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यास सुरवात केली आहे.

पुणे - मनोरंजनासाठी एसटी महामंडळाने एसटी गाड्यांमध्ये बसविलेल्या वायफाय सुविधेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दररोज सुमारे चाळीस लाखांहून अधिक प्रवासी या सुविधेचा फायदा घेत असून, त्यामध्ये सर्वाधिक मराठी चित्रपट पाहण्यास प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. वाढता प्रतिसाद बघून एसटी महामंडळाने सर्वच गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यास सुरवात केली आहे.

एसटीचे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध उपयोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटी गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान मनोरंजन करण्यासाठी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार पुढे आला होता. त्यानुसार ही सुविधा देण्यासाठी महामंडळाकडून मुंबई येथील कांगो यंत्र मीडिया कंपनीबरोबरच करार केला होता. या कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे महामंडळाने सर्वच गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

एसटी महामंडळाच्या सुमारे १८ हजार ५०० एसटी गाड्या आहेत. आतापर्यंत १२ हजाराहून अधिक गाड्यांमध्ये आतापर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटीचे दररोजची प्रवासी संख्या ही जवळपास ७० लाख एवढी आहे. सण आणि सुट्ट्यांच्या कालावधीत ही संख्या वाढते. दैनंदिन प्रवास करणाऱ्यांपैकी चाळीस लाख प्रवासी रोज या सुविधेचा लाभ घेत असल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी सांगितले.

या सुविधेसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात नाही. ही सुविधा केवळ प्रवासदरम्यानच वापरता येते. ज्या गावांमध्ये मोबाईल टॉवर नाही, रेंज नाही, त्या ठिकाणीदेखील या सुविधेचा लाभ घेता येतो. त्यासाठी एसटी गाड्यांमध्ये स्वतंत्र वायफाय बॉक्‍स बसविण्यात आला आहे, असेही भोसले यांनी सांगितले.

इंटरनेट कसे वापराल
एसटी गाडीत बसल्यानंतर स्मार्ट फोनमधील वायफाय सुविधा ऑन करावी. त्यानंतर ‘केआयव्हीआय’ पासवर्ड आल्यानंतर तो कनेक्‍ट करावा. त्यानंतर ‘डेडीकेटेड इंटरनेट’ ही सुविधा सुरू होते. यामध्ये निवड हिंदी- मराठी शंभर चित्रपट, गाणी, नाटके यांच्यासह विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती देणारे फलकही सर्व गाड्यांमध्ये लावण्यात आले आहेत. लवकरच एसटी महामंडळाच्या सर्वच गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही भोसले यांनी सांगितले.

Web Title: pune news wi-fi MSRTC st bus