‘वाय-फाय स्पॉट’ अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पुणे - पुणेकरांसाठी शहरात २०० ठिकाणी महापालिकेतर्फे ‘वाय-फाय स्पॉट’ निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, २६ जून रोजी त्याचे उद्‌घाटन होणार आहे. या अंतर्गत पहिला अर्धा तास नागरिकांना ही सुविधा मोफत मिळणार असून, त्यानंतर माफक दरात इंटरनेट उपलब्ध होणार आहे.  

स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. एल अँड टी, रेलटेल आणि गुगलच्या एकत्रित प्रयत्नांतून हा उपक्रम शहरात साकारण्यात येत आहे. त्या अंतर्गत ५१२ केबीपीएस वेगाने नागरिकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल. महापालिकेची शहरातील सर्व उद्याने, काही रुग्णालये, काही पोलिस ठाणी आणि बसथांब्यांवर ही सेवा मिळणार आहे. ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ सर्वाधिक आहे, त्या ठिकाणी वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी यूजर आयडी आणि पासवर्डची माहितीही नागरिकांना तेथेच मिळेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

मोबाईल संच, लॅपटॉपवर नागरिक वाय-फाय सुविधेचा लाभ घेऊ शकतील. त्यासाठी रेलटेल कंपनी इंटरनेट वाय-फायद्वारे पुरविणार आहे. ही कंपनी पुण्यासह देशातील सुमारे दीडशेहून अधिक रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा पुरवीत आहे. पहिला अर्धा तास किंवा ५० एमबीपीएस डाटा वापरेपर्यंत नागरिकांना ही सुविधा मोफत असेल. त्यानंतर नाममात्र शुल्क आकारून ही सुविधा पुरविली जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्‌घाटन गेल्या वर्षी २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. त्याला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून २०० वाय-फाय स्पॉटचे उद्‌घाटन होणार आहे.

Web Title: pune news wi-fi spot final step