बनावट नियुक्तिपत्राद्वारे तरुणांची लूट

संभाजी पाटील 
रविवार, 23 जुलै 2017

सरकारी नोकरीचे आमिष; आंतरराज्य टोळ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष 
पुणे - केवळ एक ‘एसएमएस’ करून आणि फोनवर चार गोड शब्द बोलून जर तुम्हाला चांगल्या पगाराची आणि सरकारी नोकरी मिळत असेल तर... साहजिकच काहीही करून अशी नोकरी मिळविण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

सरकारी नोकरीचे आमिष; आंतरराज्य टोळ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष 
पुणे - केवळ एक ‘एसएमएस’ करून आणि फोनवर चार गोड शब्द बोलून जर तुम्हाला चांगल्या पगाराची आणि सरकारी नोकरी मिळत असेल तर... साहजिकच काहीही करून अशी नोकरी मिळविण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

राजमुद्रा उमटवलेले सरकारी नोकरीचे नियुक्तिपत्रच तुमच्या घरी येत असेल तर त्यासोबत जोडलेल्या सर्व अटी मान्य करून प्रशिक्षणासाठी काही रक्कम भरण्यास तुम्ही निश्‍चितच तयार असाल; पण थांबा. सरकारी नोकरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन त्याद्वारे प्रत्येक उमेदवाराकडून हजारो रुपये उकळणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सध्या कार्यरत असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे. 

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे राहणारा जगदीश रमेश जडे हा प्रिंटिंग टेक्‍नॉलॉजीमध्ये डिप्लोमा झालेला तरुण. नोकरीच्या शोधात त्याने एक छोटी जाहिरात पाहिली. ‘टीव्ही चॅनेल क्षेत्र मे चाहिए लडके-लडकियाँ’ अशा त्या जाहिरातीत नोकरीसाठी दहावी पास ते पदवीधर अशी पात्रता दिली होती. पगार २२ हजार ५०० ते ३१ हजार ५०० दिला होती. ही नोकरी मिळविण्यासाठी फक्त ०८८७४८९१३९२ या क्रमांकावर एसएमएस करायचा होता. जगदीशने तत्काळ ‘एसएमएस’ केला. तत्परतेने त्याला एक फोन आला. त्यात अधिक तपशील विचारण्यात आला. तुम्हाला लवकरच घरी नियुक्तीचे पत्र मिळेल, असे त्याला सांगण्यात आले; पण त्यासोबतच्या अटींचे पालन करण्याची अटही घालण्यात आली. 

पाच दिवसांनी जगदीशला ‘भारतीय सूचना एवं प्रसारण मंत्रालय’ या विभागाचेच पत्र आले. पत्ताही दिल्लीचाच. पत्र उघडले तर दूरदर्शन किसान वाहिनीचा सहीशिक्का आणि मंत्रालयाच्या लेटरहेडवरचे नियुक्तिपत्र. या नियुक्तिपत्रात जगदीशला डी. डी. किसान या वाहिनीमध्ये ‘किसान पत्रकार’ या पदावर ३२ हजार ५०० रुपये पगाराची नोकरी दिल्याचे म्हटले होते.     

पत्रावर खाली सूचना प्रसारण मंत्रालयाचे संचालक डॉ. राकेश कुमार सिंह यांची स्वाक्षरी आणि शिक्का होता. त्यासोबतच प्रशिक्षणासाठी तुम्हाला १३ हजार ८६० रुपये भरावे लागतील, असे नमूद केले होते. हे पैसे भरण्यासाठी ०९६१६८६७८१४ हा मोबाईल क्रमांक दिला होता. या क्रमांकावरच पैसे कोणत्या खात्यावर भरायचे, याची माहिती मिळणार होती. 

जगदीशला याची शंका आल्याने त्याने पैसे भरण्याचे टाळले. तर हे पैसे तातडीने भरा; अन्यथा तुमची नोकरीची संधी हुकेल, असा फोनही त्याला आला. जगदीशला हा एकूणच प्रकार बनावट वाटल्याने त्याने पैसे भरले नाहीत; पण असे पैसे भरणारे आणि स्वतःची फसवणूक करून घेणारे हजारो तरुण आहेत. या टोळ्या आजही कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील तरुण या आमिषाला बळी पडत आहेत. त्यांच्याकडून परस्पर पैसे उकळून गायब होत आहेत. 

तक्रार देण्याचे पोलिसांचे आवाहन
या जाहिरातीतील दूरध्वनी क्रमांकावर ‘सकाळ’ प्रतिनिधीने फोन लावला असता एका महिलेने पैसे भरा, तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल, असे सांगितले. महिलेने स्वतःचे नाव आरती छाब्रा असल्याचे सांगून हरियाना, गुडगाव येथून बोलत असल्याचे सांगितले. आपण सरकारचे भरती अधिकारी असल्याचा दावाही तिने केला. डीडी किसान हे एक उदाहरण आहे. केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांच्या जाहिराती पाहून त्याची बनावट नियुक्तिपत्रे देऊन पैसे उकळणाऱ्या अनेक आंतरराज्य टोळ्या कार्यरत आहेत. त्यांचे फोन, पत्ते सर्व बनावट आहेत. अशी फसवणूक होत असल्यास तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

अशी भरतीच नाही : डीडी किसान 
प्रसार भारतीच्या ‘डीडी किसान’ वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, अशी कोणतीही भरती आमच्याकडे सुरू नाही. आमच्याकडेही फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तरुणांनी कोणालाही पैसे देऊ नयेत. स्थानिक पोलिसांत या संदर्भात तक्रार दाखल करावी, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: pune news Youth robbery through fake appointment letter