पोल्ट्री व्यवसायातून युवकांनी उद्योजक व्हावे: जानकर

पोल्ट्री व्यवसायातून युवकांनी उद्योजक व्हावे: जानकर

पुणे: दैनंदिन आहारात पोषणमूल्य असलेल्या अंड्यांचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. त्यासाठी अंड्याविषयी जनजागृती आणि व्यापक प्रसिद्धी आवश्‍यक आहे. अंड्याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजल्यास शेतीपूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल. पोल्ट्री व्यवसायाकडे प्रमुख व्यवसाय म्हणून वळल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात, असे मत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे "जागतिक अंडी दिना'निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

"मानवी आहारातील अंड्यांचे पोषणमूल्य नागरिकांपर्यंत पोचविणे, कुक्कुटपालन व्यवसायास चालना मिळावी व ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना मिळावी' यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ""आरोग्याच्यादृष्टीने अंड्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्या महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. यासाठी महिलांनी दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करावा. अंडी उत्पादन घराघरांत व्हावे, यासाठी सरकार राबवत असलेल्या योजनांची अंमलबजावणी झाली, तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. एक सजग नागरिक म्हणून युवकांनी या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करावा.''

"जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा' तालुका समन्वयक शिल्पा ब्राह्मणे यांनी शिरूर तालुक्‍यातील स्वयंसहायता महिला बचत गटामार्फत सुरू असलेल्या अंडी उत्पादन व्यवसायाच्या उपक्रमांबद्दल, तर आहारतज्ज्ञ डॉ. गीता धर्मती यांनी आहारातील अंड्याचे महत्त्व व त्यातील महत्त्वाचे घटक याविषयी माहिती दिली. तसेच, अंड्याविषयी असणारे गैरसमज आणि शंकांचे निरसन केले. या वेळी उपस्थितांना उकडलेल्या अंड्यांचे वाटप करण्यात आले. पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी प्रास्ताविक केले. आशिष जरद यांनी सूत्रसंचालन केले. अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी आभार मानले.

या वेळी "केंद्रीय कुक्कुट अनुसंधान केंद्रा'च्या निर्देशक भारती सिंह, कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पुणे कृषी बाजार उत्पन्न समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे, सहआयुक्त डॉ. गजानन राणे, वेंकीज इंडियाचे व्यवस्थापक विजय तिजारे यांच्यासह विद्यार्थी, नागरिक, तसेच विविध विभागांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com