बनावट डॉक्‍टरांच्या शोधासाठी मोहीम - मांढरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - जिल्ह्यात बनावट वैद्यकीय व्यावसायिकांचा (डॉक्‍टर) तातडीने शोध घेऊन, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांना गुरुवारी दिला. या आदेशानुसार शुक्रवारपासून (ता. १२) ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात बनावट वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी ‘जलद शोध मोहीम’ राबविली जाणार आहे. याबाबतची पत्रे गुरुवारी तातडीने सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहेत.

ही मोहीम संपताच १ फेब्रुवारी २०१८ ला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे अहवाल सादर करण्याचा आदेशही मांढरे यांनी दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या जागरूकतेमुळे बुधवारी (ता. १०) एक बनावट डॉक्‍टर सापडला.

या शोधमोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावनिहाय प्रत्येकी एक कर्मचारी नियुक्त करावा, या कर्मचाऱ्याने त्याला नेमून दिलेल्या गावात जाऊन बनावट वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घ्यावा आणि त्याबाबतचा अहवाल आपापल्या तालुक्‍याच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

गावनिहाय नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी बनावट डॉक्‍टरचे नाव व पत्ता, त्याची शैक्षणिक पात्रता, मेडिकल कौन्सिलची परवानगी आहे का नाही, असल्यास संबंधित मेडिकल कौन्सिलचे नाव, दवाखाना आदी नोंदी केल्या जाणार आहेत.

शोधमोहिमेचा रोज आढावा
शोधमोहिमेचा दररोज आढावा घेण्याचा आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे तालुका वैद्यकीय अधिकारी रोज आढावा घेणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील बनावट डॉक्‍टरांना पूर्णपणे आळा बसू शकेल, असा विश्‍वास मांढरे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: pune news Zilla Parishad Chief Executive Officer Suraj Mandhare