पुण्याचा वृत्तपत्र विक्रेता संदीप झाला ‘सीए’

पुण्याचा वृत्तपत्र विक्रेता संदीप झाला ‘सीए’

पुणे - मनात जिद्द असेल आणि संघर्ष करण्याची तयारी असेल, तर वृत्तपत्र घरोघरी टाकता-टाकता एखादा विक्रेता चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होऊ शकतो, हे येथील संदीप भंडारी या युवकाने दाखवून दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीपुढे हार न मानता दहा बाय दहाच्या खोलीत राहून संदीपने मिळविलेले यश हे प्रेरणादायी आहे. 

संदीप धर्मा भंडारी (वय ३०) या युवकाच्या यशाची दखल समस्त वृत्तपत्र विक्रेत्यांनीही घेतली आहे. येथील बालाजीनगरमध्ये राहणारा संदीप घरच्या परिस्थितीमुळे वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम करीत होता. आता सीए झालो असलो, तरी वृत्तपत्र टाकण्याची अजूनही तयारी आहेच, असेही संदीप सांगतो. 

संदीपचे वडील टेलरिंगचे काम करायचे, तर आई एका खासगी रुग्णालयात मावशी म्हणून काम करायची. नाजूक आर्थिक परिस्थितीशी झगडत संदीपने गरवारे महाविद्यालयातून २००८ मध्ये पदवी मिळविली. तत्पूर्वी पाचवीपासून तो वृत्तपत्र टाकत होताच. त्याची सीए करण्याची इच्छा तीव्र होती. नोंदणीसाठी साडेतीन हजार रुपयेही त्याने कसबसे जमविले. सीएच्या एका क्‍लासची फी १२ हजार ५०० रुपये भरण्याची त्याची ऐपत नव्हती. क्‍लासचालकाने त्याची गुणवत्ता जोखून ५०० रुपये कमी केले. उर्वरित फी हप्त्याने भरण्याचीही सवलत दिली. त्या वेळी त्याने घरोघरी जाऊन केबलचे पैसे गोळा करण्याचेही काम सुरू केले. पुढचे शिक्षण, क्‍लाससाठी त्याने सुवर्णयुग सहकारी बॅंकेतून सुरवातीला ५० हजार व नंतर एक लाख रुपयांचे कर्ज काढले. पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत वृत्तपत्र टाकायचे. त्यानंतर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गुलटेकडीतील महावीर अभ्यासिकेत अभ्यास आणि सायंकाळी केबल आणि वृत्तपत्राचे पैसे गोळा करायचे, असा त्याचा दिनक्रम होता. परीक्षेत यश हुलकावणी देत असले, तरी संदीपने जिद्द सोडली नाही. ते पाहून त्या भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी त्याला मदतीचा हात पुढे केला. संदीपने स्वतःची ‘पेपर लाइन’ सुरू केली. त्याच्या संघर्षाला नुकतेच फळ मिळाले. संदीप ‘सीए’ झाला. या प्रवासात बहिणीच्या ‘एम.कॉम’पर्यंतच्या शिक्षणाचीही जबाबदारी त्याने पार पाडली. 

संदीप हा गुणी मुलगा आहे. कष्ट करीत त्याने मिळविलेल्या यशामुळे वृत्तपत्र टाकण्याच्या आमच्या व्यवसायाचा सन्मान झाला आहे. त्याचा संघर्ष केवळ आमच्याचसाठी नव्हे, तर समाजासाठी प्रेरणादायी आहे. या यशामुळे संदीप इतकाच आनंद आम्हालाही झाला आहे.  
- विजय पारगे, अध्यक्ष,  पुणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना

‘सीए’ होण्याचे स्वप्न बारावीपासूनच बघत होतो. खूप अडचण वाटत होती. परंतु, वाटेवर अनेक हिंतचिंतकांनी सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळे माझा हुरूप वाढला आणि आणखी जोमाने तयारी केली. त्यामुळे अडथळे पार करीत परीक्षा पास झालो. आता मला समाधान वाटत आहे.
- संदीप भंडारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com