esakal | Pune : राज्यात 'निपाह'चे सर्वेक्षण सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : राज्यात 'निपाह'चे सर्वेक्षण सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात निपाह विषाणूंच्या संसर्गाबद्दल सर्वेक्षण सुरू आहे. वटवाघुळांमधून पसरणाऱ्या या आजाराचा एकही रुग्ण अद्यापपर्यंत राज्यात आढळला नाही, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

देशात कोरोना विषाणूंचा उद्रेक सुरू आहे. त्यातच राज्यातील पुणे जिल्ह्यात झिका विषाणूंचा संसर्गाचा एक रुग्ण आढळला. या विषाणूंबरोबरच केरळमध्ये निपाह या विषाणूंच्या संसर्गाने एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. या पार्श्वभूमिवर राज्यात निपाह विषाणूंचे सर्वेक्षण सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही.

हेही वाचा: सुसंस्कृत पुण्यात लाजिरवाणी घटना; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

महाराष्ट्रात निपाह विषाणू सापडल्याचे संशोधन ‘राष्ट्रीय विषाणू संस्था’मधून (एनआयव्ही) पुढे आले आहे. महाबळेश्वर येथे केलेल्या वटवाघुळांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला. त्या बाबतचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ इन्फेक्शन अँण्ड पब्लिक हेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. महाबळेश्वरमधील वटवाघुळांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 33 वटवाघुळांमध्ये निपाह विषाणूंच्या विरोधातील प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तयार झाल्याचे दिसले. एका वटवाघुळात निपाहचा संसर्ग झाल्याचेही स्पष्ट झाले.

केरळमध्ये 2018 मध्ये याचा उद्रेक झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एका मुलाचा मृत्यू निपाह विषाणूंच्या संसर्गामुळे झाला. त्यामुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याने या बाबतचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

हेही वाचा: माळेगावात दोन व्यापाऱ्यांची हाणामारी इतर विक्रत्यांना पडली महागात

या बद्दल राज्याच्या आरोग्य खात्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, “राज्यात आतापर्यंत निपाह विषाणूंचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. त्या बाबतचे सर्वेक्षण सुरू आहे. केरळमध्ये यापूर्वीही निपाहचा उद्रेक झाला होता. त्यावेळीही राज्यात रुग्ण आढळला नव्हता. मात्र, या बाबत सातत्याने सर्वेक्षण सुरू आहे.”

लक्षणे

  1. ताप

  2. डोकेदुखी

  3. घसादुखी

  4. श्वास घेण्यास अडथळा

loading image
go to top