esakal | पुणे : घरगुती वीजबिलात बचतीची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : घरगुती वीजबिलात बचतीची संधी

पुणे : घरगुती वीजबिलात बचतीची संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: घरगुती, गृहनिर्माण सोसायट्या अथवा निवासी कल्याणकारी संघटनांना छतावर (रुफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यामुळे घरगुती वीजबिलात मोठी बचत करण्याची संधी मिळणार आहे. तसेच नेटमीटरिंगद्वारे वर्षअखेर शिल्लक वीज महावितरणला विकतात येणार आहे.

केंद्र सरकारने रुफटॉप सौर योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर केले आहे. यामध्ये घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॉट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा छतावर बसविण्यासाठी सरकारकडून वित्त साहाय्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुणे : मिळकत वाटप नियमावलीत होणार सुधारणा

पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॉट ४६ हजार ८२० रुपये, १ ते २ किलोवॉट ४२ हजार ४७०, २ ते ३ किलोवॉट ४१ हजार ३८०, ३ ते १० किलोवॉट ४० हजार २९० आणि १० ते १०० किलोवॉटसाठी ३७ हजार२० रुपये प्रति किलोवॉट किंमत जाहीर केली आहे. या दराप्रमाणे ३ किलोवॉट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त साहाय्य मिळेल व संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल.

ही यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचा आर्थिक फायदा संबंधित घरगुती ग्राहकांना होणार आहे.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची सुमारे ३ ते ५ वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत व पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

असे असेल अनुदान...

या योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येईल. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची सोय

महावितरणने सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाइन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

loading image
go to top