पुण्याच्या संस्थांचा दिल्लीत सन्मान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

इतिहास दिल्लीत गाजेल
स्वतंत्र थिएटरचे संस्थापक युवराज शहा म्हणाले, ‘‘गेली तेरा वर्षे आमची संस्था हिंदी नाटकांसाठी काम करीत आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ही वसंत कानेटकर यांची अजरामर मराठी कलाकृती आहे. यातून महाराष्ट्रातील इतिहासाची शौर्यगाथा देशभर पोचावी म्हणून त्याचे हिंदी रूपांतर केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने त्याची दखल घेतली. हे नाटक भारत रंगमहोत्सवात सादर होत आहे. महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा दिल्लीत गाजेल.’’

पुणे - देशातील प्रतिष्ठित आणि नाट्यकलेतील सर्वोच्च मानल्या गेलेल्या दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) या संस्थेतर्फे भरविण्यात येणाऱ्या भारत रंगमहोत्सवात यंदा पुण्यातील स्वतंत्र थिएटर आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थांना मानाचे स्थान मिळाले आहे. या संस्थांची ‘जाग उठा है रायगड’, ‘मृच्छकटिक’ ही नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत.

या महोत्सवासाठी आलेल्या साडेसातशेहून अधिक नाटकांच्या प्रवेशिकांतून ५६ नाटकांची निवड झाली. यात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या गाजलेल्या नाटकाचे हिंदी रूपांतर अर्थात ‘जाग उठा है रायगड’ या नाटकाची निवड झाली. ‘स्वतंत्र थिएटर’ने याची निर्मिती केली असून, अभिजित चौधरी यांनी दिग्दर्शन, तर धनश्री हेबडीकर यांनी कलादिग्दर्शन केलेले आहे. नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये ११ फेब्रुवारीला २५ कलाकारांसह या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या ‘मृच्छकटिक’ या नाटकाचीही निवड झाली आहे. येत्या १६ फेब्रुवारीला या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. दिग्दर्शक रवींद्र खरे  म्हणाले, ‘‘‘मृच्छकटिक’च्या सादरीकरणात काही बदल केले असून, प्रसंग, भावनांना अनुकूल कथक नृत्ये त्यात भरली आहेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune organisation honor in delhi