धुळीने काळवंडली पुणेकरांची त्वचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune People Black Skin

पुण्याच्या सर्वच भागांत कुठे न कुठे बांधकामे सुरू आहेत. कुठे मेट्रोचे काम, तर कुठे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. जलवाहिनी, गॅसवाहिनी यांच्याही कामाची भर त्यात पडल्याची दिसते.

Pune People : धुळीने काळवंडली पुणेकरांची त्वचा

पुणे - पुण्याच्या सर्वच भागांत कुठे न कुठे बांधकामे सुरू आहेत. कुठे मेट्रोचे काम, तर कुठे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. जलवाहिनी, गॅसवाहिनी यांच्याही कामाची भर त्यात पडल्याची दिसते. इमारतींची बांधकामेही यात आघाडीवर आहेत. यातून शहरात मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होते. त्याचा थेट दुष्परिणाम पुणेकरांच्या त्वचेवर होऊन त्वचा काळवंडली जात असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

शहराच्या मध्यवस्तीच्या भागांसह बाणेर, शिवाजीनगर, नगर रस्ता परिसरात मेट्रोचे काम जोरदार सुरू आहे. सिंहगड रस्त्यावर उड्डाण पुलाचे बांधकामाला गती मिळाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यासाठी सतत कामे सुरू आहेत. तसेच, अंतर्गत रस्त्यावर कुठे जलवाहिनी तर, कुठे गॅसवाहिनीच्या कामासाठी खोदकाम केले जात आहे. यातून दिवसभरात पुणेकरांच्या त्वचेवर धूळ, धूर अशा प्रदूषकांचा थर तयार होतो. त्यातून पुणेकरांमध्ये त्वचा तडतडण्यासह त्वचेचे विकार वाढत असल्याचे निरीक्षण त्वचारोग तज्ज्ञांनी नोंदविले.

प्रदूषकांमुळे त्वचा बारीक कापली जाते

शहरात यापूर्वी हिवाळ्यात तडतडणे आणि उन्हाळ्यात कोरडी पडणे, असे सामान्यतः त्वचेचे आजार होते. पण, आता तडतडलेल्या त्वचेतून धूळ आतमध्ये गेल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्वचेवर साचलेल्या प्रदूषकांचा थरामुळे त्वचा बारीक कापली जाते. त्वचेचा हा काप आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण, त्यातून प्रदूषक आतमध्ये प्रवेश करतात. त्यातून त्वचेला संसर्गाची शक्यता वाढते, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

त्वचारोगाची मलमांची मागणी वाढली

शहरात चार ते पाच वर्षांपूर्वी विक्री होणाऱ्या त्वचारोगावरील मलमांची विक्री तीन ते चार पटींनी वाढली असल्याची माहिती फार्मासिस्ट ज्ञानेश वैद्य यांनी दिली. ते म्हणाले, “पूर्वी हिवाळा आला की, तेवढ्या पुरती त्वचेवर लावणाऱ्या मलमांची विक्री वाढत असते. त्यानंतर उन्हाळ्यात सनस्क्रीन, अँटी यूव्ही मलमांचा वापर वाढला. आता त्वचारोगाच्या मलमांची मागणी वाढली आहे.

हे करा...

मॉइश्चरायझर वापरा

हिवाळ्यात हवेतील आद्रतेचे प्रमाण असते. अशा स्थितीत त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञ देतात. अंघोळ झाल्यानंतर ती ओलसर असलेल्या त्वचेवर लावणे उपयुक्त ठरते.

योग्य आहार

त्वचेच्या मलमांवर खर्च करण्यापेक्षा फळे, पालेभाज्यांचे आहारातील प्रमाण वाढवा. त्यातून योग्य पोषणद्रव्य त्वचेला मिळतात. योग्य आहारातून त्वचेचे आरोग्य नैसर्गिकपणे चांगली राहाते.

नियमित व्यायाम...

  • घाम येईपर्यंत व्यायाम हा किमान निकष ठेवावा. त्यामुळे त्वचेची रंध्रे उघडतात आणि त्वचेवरील प्रदूषक घटक बाहेर पडण्यास मदत होते.

  • शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घाला

  • उघड्या शरीरावरील त्वचेवर प्रदूषक घटक बसतात. हे टाळण्यासाठी पूर्ण शरीरभर कपडे घाला. विशेषतः शहरातून रस्त्याने फिरताना ही काळजी घ्या.

  • दिवसभर प्रदूषणातून फिरल्यामुळे त्वचेवर प्रदूषक घटकांचा थर जमा होतो. तो स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याने दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याचा सल्लाही त्वचारोग तज्ज्ञांनी दिला.

स्वयंचलित वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि वेगवेगळ्या बांधकामांमधून उडणारे सूक्ष्म धूलिकण पुणेकरांच्या त्वचेचे आरोग्याला धोका निर्माण करणारे प्रमुख प्रदूषक आहेत. त्यातून पुणकरांमध्ये त्वचा विकार वाढत असल्याचे दिसते. विशेषतः त्वचा सैल होणे, सुरकुतणे याचे प्रमाण वाढत आहे. त्वचा काळी होऊन असलेल्या वयापेक्षा माणसाच्या चेहऱ्यावरून त्याचे वय जास्त वाटते (एजिंग) या समस्यांवर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

- डॉ. रश्मी अडेराव, त्वचारोग तज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक

मार्केटिंगची नोकरी असल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागांत सातत्याने फिरावे लागते. धूर, धूळ आणि उन्हाचा चटका याचा थेट दुष्परिणाम आता त्वचेवर होताना दिसत आहे. दहा वर्षांमध्ये त्वचा काळवंडली असून, त्यातील कोरडा वाढला आहे. त्यामुळे हाताला सुरकुत्या पडू लागल्या आहेत.

- सुहास पाटील, नागरिक