व्यावसायिक गौतम पाषाणकर यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक असलेले पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजल्यानंतर जंगली महाराज रस्ता येथून बेपत्ता झाले होते.

पुणे - शिवाजीनगर पोलिसांकडून बेपत्ता झालेले पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व बांधकाम व्यावसायिक गौतम विश्‍वानंद पाषाणकर (वय 65) यांच्या शोधासाठी पाच पथके नेमण्यात आली आहे. या पथकांकडून पाषाणकर यांचा शहरात सर्वत्र शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. 

ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक असलेले पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजल्यानंतर जंगली महाराज रस्ता येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते आढळून न आल्याने त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार नोंदविली. दरम्यान, त्यांनी त्यांच्या चालकाकडे दिलेल्या एका लिफाफ्यामध्ये चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये आत्महत्या करण्यास जात असल्याचा उल्लेख केला आहे. 

हे वाचा - पुण्यात 'पीएमपी'ची विमानतळावरून ई-बससेवा सुरू

दरम्यान, पाषाणकर यांच्या शोधासाठी शिवाजीनगर पोलिसांकडून पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामधील काही पथके शहरातील हॉटेल्सची पाहणी करणार आहेत, तर काही पथके सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे शोध घेणार आहेत. पाषाणकर यांच्याविषयी कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी कपिल पाषाणकर ( मोबाईल क्रमांक 9822474747) किंवा शिवाजीनगर पोलिस ठाणे (020-25536263) यांच्याशी संपर्क साधावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune police 5 teams for searching businessmen gautam pashankar