Lockdown : 31 मार्चपर्यंत शहरात जमावबंदी; पोलिसांचा राहणार वॉच!

Police
Police

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार सोमवारपासून ते 31 मार्चपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले.

या आदेशानुसार, सोमवारपासून दोन्ही शहरांमध्ये पाच नागरीकांपेक्षा जास्त नागरीकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी असणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे संपुर्ण शहरावर बारकाईने लक्ष असणार आहे. 

कोरोनाच्या सद्यस्थितीची आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यासंदर्भातचा आदेश दिला. त्यापाठोपाठ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्याशी संवाद साधला. 

''जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार, जमावबंदीच्या आदेशामधून जीवनावश्‍यक वस्तुंना वगळण्यात आले आहे. त्यामध्ये भाजीपाला विक्रेते, किराणा व्यावसायिक, रुग्णालये, वैद्यकीय क्षेत्राचा समावेश केला आहे. मात्र वस्तुंचा साठा करुन गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल.'' असे डॉ.वेंकटेशम यांनी स्पष्ट केले.

जमावबंदीच्या आदेशानुसार पाच व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही, कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम, इव्हेंट घेता येणार नसल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रविवारच्या 'जनता कर्फ्यु'नंतर रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत डॉ.शिसवे यांच्या आदेशानुसार, शहरामध्ये 144 कलम लागू करण्यात आले होते. 

खासगी व सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मनाई : 

सर्व कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, ऊरूस, स्पर्धा, व्यायामशाळा, कॅम्प, प्रशिक्षणवर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, सहली. 

हे बंद राहणार :

दुकाने, आस्थापना, उपहारगृहे, हॉटेल्स, खानावळ, शॉपिंग कॉम्पलेक्‍स, मॉल्स, सुपर मार्केट, क्‍बल,पबसारखी मनोरंजनाची ठिकाणे, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, चित्रपटगृह, नाट्यगृह, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये,ऑनलाईन लॉटरी सेंटर, व्हिडीओ पार्लर आदी 

जमावबंदीतून वगळलेली क्षेत्र :

शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळे, रुग्णालये, पॅथलॉजी लॅब, दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिग कॉलेज, पेट्रोल पंप, किराणा मालाची दुकाने, दूध, भाजीपाला, जीवनावश्‍यक वस्तु, पाणी, माहिती तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, उत्पादन व निर्मिती केंद्रे 
- पूर्वनियोजीत लग्नसमारंभ 25 व्यक्तींपुरता मर्यादीत ठेवावा 
अंत्यविधीसाठी गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी.

''कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोमवारी सकाळपासून शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. अत्यावश्‍यक सेवा व सेवा पुरविणाऱ्यांना वगळता जमावबंदीचा आदेश सर्वांना लागू आहे. त्यादृष्टीने नागरीकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.''
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com