रवींद्र बऱ्हाटेची स्थावर मालमत्ता जप्त होणार? पोलिसांनी सुरू केल्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

न्यायालयाचा आदेश आल्यानंतर करणार कारवाई, कोथरुड पोलिसांनी दिली माहिती

पुणे : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झालेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता बऱ्हाटेच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. न्यायालयाकडून मालमत्ता जप्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई केली जाणार आहे. 

2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. सरगम सोसायटी, धनकवडी व मधुबन अपार्टमेंट, लुल्लानगर) याच्यासह दीप्ती आहेर, शैलेश जगताप, देवेंद्र जैन, आमेल चव्हाण यांच्याविरुद्ध सुधीर वसंत कर्नाटकी (रा.कोथरुड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 9 जुलैला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते.

दरम्यान, बऱ्हाटे याने अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालय, उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सार्वेच्च न्यायालयानेही बऱ्हाटेचा जामीन नामंजुर केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी बऱ्हाटे विरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. 

कोरोनाच्या लसीबाबत आदर पूनावाला यांचा खुलासा; म्हणाले 'सरकारची परवानगी...'​

पोलिसांनी बऱ्हाटे याचा शोध घेऊनही तो मिळून आलेला नाही, त्यामुळे न्यायालयाने 3 ऑक्‍टोबरला भारतीय दंड संहिता (सीआरपीसी) कलम 82 नुसार जाहीरनाम्याचा आदेश जारी केला होता. पोलिसांनी संबंधित जाहीरनामा पुणे शहर आणि परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केला होता. त्यानंतरही बऱ्हाटे पोलिसांना मिळून आलेला नाही.

त्यामुळे पोलिसांनी आता त्यापुढील सीआरपीसी 83 नुसार बऱ्हाटेच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या कार्यवाहीला सुरूवात केली आहे. त्याबाबतचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कोथरुड पोलिसांनी दिली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police are trying to seize Ravindra Barhate real estate