esakal | नांदेड फाटा खून प्रकरण : पुणे ते विजापूर 2 दिवस पाठलागानंतर पाच आरोपींना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

खून केल्यानंतर सर्व आरोपी आपले मोबाईल फोन बंद करून फरार झाले होते.मोबाईल फोन बंद असल्यामुळे आरोपींचे लोकेशन मिळवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. 

नांदेड फाटा खून प्रकरण : पुणे ते विजापूर 2 दिवस पाठलागानंतर पाच आरोपींना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे 12 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अजय शिवाजी शिंदे  या तरुणाची हत्या करून फरार झालेल्या पाचही आरोपींना हवेली पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून ताब्यात घेत कोणतीही तांत्रिक माहिती हाती नसताना मोठ्या शिताफीने कारवाई करत  गुन्हा उघडकीस आणला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल संपकाळ, रोहित संपकाळ, दुर्वेश उर्फ दुर्ग्या, सुधीर उर्फ सुध्या आणि पृथ्वी उर्फ चिराग (सर्व राहणार नांदेड ता.हवेली, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. 12 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नांदेड फाट्याजवळील कीर्ती हॉटेलच्या समोर भररस्त्यावर अजय शिंदे याची कोयता, लोखंडी पाईप, विटा इत्यादींचा वापर करून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खून केल्यानंतर सर्व आरोपी आपले मोबाईल फोन बंद करून फरार झाले होते.मोबाईल फोन बंद असल्यामुळे आरोपींचे लोकेशन मिळवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपींच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनवे, संतोष भापकर, राजेंद्र मुंढे व तीन होमगार्ड असे एक पथक घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी साताराकडे रवाना झाले होते.

आरोपीच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करून आरोपी कोठे जाऊ शकतात याची माहिती पोलीस नाईक रामदास बाबर शोधासाठी गेलेल्या पथकाला कळवत होते. सातारा येथून आरोपी कर्नाटकातील विजापूर येथे गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे शोध पथक रात्री बाराच्या सुमारास आरोपी लपून बसलेल्या ठिकाणी गेले. उसाच्या शेतात असलेल्या खोलीत झोपलेल्या आरोपींवर हवेली पोलिसांच्या शोध पथकाने अत्यंत गोपनीय पणे कारवाई करत सर्व आरोपींना जेरबंद केले.

हे वाचा - चोरट्याचा दिवाळी धमाका; लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेला पाच लाखाचा ऐवज पळविला

गुन्हा घडल्यापासूनच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सई भोरे-पाटील या तपासावर लक्ष ठेवून होत्या. त्यामुळे हवेली पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस प्रवास करत मोठ्या शिताफीने सर्व आरोपी जेरबंद केले. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार करत आहेत.

loading image