पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांजा विक्री करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

शौकत बाबुलाल शेख (वय 52, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गांजा विक्री करणाऱ्यास पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली.शिवाजीनगर येथे बुधवारी ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीकडून दोनशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शौकत बाबुलाल शेख (वय 52, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या विविध ठिकाणच्या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेख हा गांजा पुरविण्याचे काम करत होता. त्यानुसार, शेख बुधवारी शिवाजीनगर येथे गणेशखिंड रस्त्यावरील एका चित्रपटगृहाजवळ तरुणांना गांजा विक्री करीत असल्याची खबर युनीट चारच्या पथकास मिळाली.

हडपसर पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद 

त्यानुसार, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी शंकर पाटील, विशाल शिर्के, दत्तात्रय फुलसुंदर, राकेश खुणवे यांच्या पथकाने संबंधीत ठिकाणी सापळा रचून शेख यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दोनशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वीही गांजा विक्री व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तो तेलंगाणा येथून गांजा आणून विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police arrested seller of drugs