सिंहगड रोडवर मिळत होता फॉरेनचा गांजा; एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

अक्षय प्रकाश शेलार (वय 35, रा. बावधन) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुणे : अमेरीका, कॅनडा आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये उत्पादीत होणारा 'ओजी-कुश' हा गांजा शहरात विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सिंहगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ओजी-कुश गांजा आणि भारतात उत्पादीत होणारा गांजा असा एकूण साडे तीन लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. 

अक्षय प्रकाश शेलार (वय 35, रा. बावधन) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी रात्री सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना वडगाव बुद्रुक येथील गंगा भाग्योदय सोसायटीजवळील दि स्मोक शॉप या दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक तरुण अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याची खबर मिळाली.

पुण्यात चाललंय काय? ट्रीपल सीट गाडी अडवली म्हणून पोलिसालाच केली मारहाण​

त्यानुसार, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तेथे पाठीवरती काळ्या रंगाची सॅक अडकवून एक तरुण संशयास्पदरीत्या थांबला असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेत त्याच्याकडील सॅकची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये 72 ग्रॅम वजनाचा ओजी-कुश या गांजा आणि भारतात तयार होणारा एक किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा असा साडे तीन लाख रुपयांचा गांजा जप्त केला. त्यास अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police arrested youth for selling Oji Kush cannabis manufactured in US Canada