अखेर रवींद्र बऱ्हाटे फरारी म्हणून घोषित; बऱ्हाटेविषयी माहिती देण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

पुणे : आर्थिक फसवणूक, खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी अशा गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यास पुणे पोलिसांनी फरारी घोषित केले आहे. त्याच्या ठावठिकणाविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर बऱ्हाटे हा गुन्हा दाखल झाल्यापासून शहरातून पसार झाला आहे. न्यायालयाने त्यास फरारी घोषित केले आहे. बऱ्हाटेची लुल्लानगर, धनकवडीतील तळजाई पठार येथे घरे आहेत. पोलिसांनी त्याच्या घरांसह अन्य ठिकाणी शोध घेतला. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. 

दिवाळीनंतर पूर्वीप्रमाणेच कोर्टाचं कामकाज सुरू करा; वकिलांनी दिला कौल​

कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात कर्नाटकी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, अमोल चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बऱ्हाटेबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित कोथरूड पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी क्रमांक 020-25391010 किंवा 25391515 ) संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police has declared RTI activist Ravindra Barhate a fugitive