#निषेध : पुणे पोलिसांच्या संवेदना बधिर; कर्णबधिरांवर लाठीमार

Pune
Pune

पुणे छ कर्णबधिर व मूकबधिर मुलांना बारावीनंतर राज्य सरकारने शिक्षण देण्यासाठी विशेष महाविद्यालये सुरू करावीत, त्याचे शिक्षण सांकेतिक भाषेत मिळावे, मूकबधिरांना तंत्रशिक्षण मिळण्यासाठी नव्या संस्था उभाराव्यात आदी मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या मूकबधिर आंदोलक युवकांवर शहर पोलिसांनी सोमवारी लाठीमार केला. त्यात 12 जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. या लाठीमाराचा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निषेध केला आहे. 

पुणे स्थानकाजवळ पोलिस आयुक्तालयाच्या शेजारीच समाजकल्याण आयुक्तांचे कार्यालय आहे. त्याच्या बाहेरील रस्त्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यांतून सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कर्णबधिर व मूकबधिर युवक आले होते. मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे पुण्याहून मुंबईपर्यंत चालत जाण्याचा निर्धार त्यांनी केला होता. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास पोलिसांनी त्यांचा रस्ता अडविला. तत्पूर्वी, अपंग कल्याण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रस्त्यावर येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले होते.

परंतु, याबाबतचे आदेश लगेचच काढा, असा आग्रह या युवकांनी धरला. त्यानंतर युवकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रोखले. तेव्हा युवक आक्रमक होऊ लागल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. त्यामुळे युवकांची पळापळ सुरू झाली. सुमारे 15-20 मिनिटे लाठीमार सुरू होता. त्यानंतर सुमारे तासाभराने युवक पुन्हा तेथे गोळा झाले. तेव्हा युवकांच्या प्रतिनिधींबरोबर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी फोनवर चर्चा केली. कर्णबधिर व मूकबधिर युवकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

दरम्यान, मोर्चा काढण्यासाठी युवकांनी परवानगी घेतली नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, असे बंडगार्डन पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. ए. मुजावर यांनी सांगितले. ही घटना घडल्यावर खासदार सुप्रिया सुळे, तसेच लक्ष्मण माने, चेतन तुपे आदींनी युवकांची भेट घेतली. त्यांनी तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, ""मूकबधिर मुलांवर झालेला लाठीहल्ला ही दुर्दैवी गोष्ट आहे. ज्या मुलांना बोलता, ऐकता येत नाही त्यांच्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश देणाऱ्याचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना शिक्षक हवेत ही काय चुकीची मागणी आहे काय? अधिकाऱ्यांना त्याबाबत सांगूनही ते ऐकत नसतील तर या सरकारचा काही उपयोग आहे का? या मुलांचे सरकारला शाप लागतील. सत्ताधारी पक्षाचे नेते खाबूगिरीत गुंग आहेत, त्यामुळे त्यांना या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांशी काही देणेघेणे राहिले नाही. निवडणुका पैशांवर जिंकणे, पैसे कमावणे एवढेच सुरू आहे. दुसऱ्या सरकारला दोष देण्याचा अधिकार सरकारला आता राहिला नाही. 

पुण्यात मूकबधिर बांधवांवर लाठीमार करून सरकारने असंवेदनशीलपणाचा कळस गाठला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार करण्याचे आदेश दिले, त्यांची गृहमंत्र्यांनी तत्काळ हकालपट्टी करावी. 
- धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते 

कर्णबधिरांवरील लाठीमाराची घटना निषेधार्ह आहे. या मुलांचे किमान म्हणणे तरी सरकारने ऐकून घेणे आवश्‍यक होते. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. ही घटना सामाजिक न्यायाचे उल्लंघन व वंचितांच्या हक्कांची पायमल्ली करणारी आहे. या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. 
- सुप्रिया सुळे, खासदार 

मूकबधिर त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत होते. पोलिसांनी त्यांना बदडून काढले. या सरकारला काय म्हणावे! 
- जितेंद्र आव्हाड, आमदार 

हा प्रकार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या असंवेदनशीलतेचा कळस आहे. 
- सत्यजित तांबे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष 

मुख्यमंत्र्यांनी मागविला अहवाल 
पुण्यातील मूक व कर्णबधिरांवरील लाठीमारप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त वेंकटेश यांच्याकडून अहवाल मागवला आहे. समाजकल्याण राज्यमंत्री कांबळे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. 

आंदोलकांशी आज चर्चा 
दरम्यान, खासदार अनिल शिरोळे यांनी आंदोलक तरुणांची रात्री भेट घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून दिला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मूकबधिर तरुणांबरोबर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे मंगळवारी (ता. 26) पुण्यात चर्चा करतील, असे सांगितले आहे. ही चर्चा दुपारी एकच्या सुमारास होईल. 

राजकीय पक्षांकडून निषेध 
मूकबधिर आंदोलकांवर शहर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा विविध राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. या कृतीतून सरकारची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com