संकटात सापडलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणीला पुणे पोलिसांचा मदतीचा हात

चंदननगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणी सुखरुप पोचली घरी ; कुटुंबही सुखावले
संकटात सापडलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणीला पुणे पोलिसांचा मदतीचा हात

पुणे : मैत्रीणीच्या सांगण्यावरुन नोकरीसाठी "ती' हजारो किलोमीटर अंतर पार करून पुण्यात पोचली. पण तिला मैत्रीण भेटलीच नाही. जवळचे पैसेही संपले, आता मात्र ती हवालदिल झाली. लोकांकडे मदतीची याचना करू लागली. त्यातच काही टवाळखोर तिच्या मागे लागले. तिच्याबद्दलची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिची आस्थेवाईकपणे चौकशी करून तिला उत्तरप्रदेशातील तिच्या कुटुंबाकडे जाण्याची व्यवस्था केली ती घरी पोचली आणि तिच्या कुटुंबाबरोबरच पोलिसांच्याही चेहऱ्यावर आनंद उमटला !

उत्तर प्रदेशातील कोसंबी येथील शांतीनगर अजवामधील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये राहणारी अवघ्या 19 वर्षाची प्रियांका सिंग. वडील गावोगावी फेरीवर कपडे विक्रीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वडीलांना हातभार लावण्याची प्रियांकाची इच्छा होती. म्हणून तिने पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात काम करणाऱ्या तिच्या गावाजवळच्या तिच्या मैत्रीणीशी संपर्क साधला. तिने सांगितल्यानुसार, 30 ऑक्‍टोबरला उत्तर प्रदेशातुन पुण्यामध्ये आली. मात्र मैत्रीणीचा फोन बंद लागत होता. प्रियांकाने आणलेले पैसेही संपले. मैत्रीणही मिळत नव्हती. त्यातच एका कुटुंबाने तिला आधार द्यायचा प्रयत्न केला. मात्र एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी राहणे तिला योग्य वाटले नाही. त्यामुळे ती तेथून निघून गेली. पोटात अन्न नाही, ओळखीचे कोणीही नाही. लोकांकडे मदत मागूनही कोणी मदत करत नव्हते. त्यामुळे आता तिची आबाळ होऊ लागली.

प्रियांका एक छोटीशी पिशवी घेऊन वडगाव शेरी परिसरात फिरू लागली. नागरीकांकडे मदतीची याचना सुरूच होती. त्यातच काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे तिने एका महिलेला मदत मागितली. महिलेने तिला एका ठिकाणी थांबण्यास सांगून ती निघून गेली. बराच वेळ झाल्यानंतरही महिला परतली नाही. शेवटी प्रियांका तेथूनही निघून गेली. दरम्यान, चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांना याबाबतची माहिती मिळाली.

त्यांनी तत्काळ पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, महिला पोलिस नाईक मनीषा जगताप, पोलिस शिपाई अमित कांबळे यांना तिचा शोध घेण्यास सांगितले. त्यांनी तरुणीचा शोध घेऊन चौकशी केली. तेव्हा, घडलेला प्रकार समोर आला. या सर्व घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस निरीक्षक जाधव यांनी तिच्या वडीलांशी संपर्क साधला. त्यांनी हालाखीच्या परिस्थितीमुळे पुण्याला येण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुमरे, जगताप व कांबळे यांनी तिला रेल्वेचे तिकीट काढून दिले. तिकीट तपासणीस, रेल्वे पोलिस यांना स्पष्ट सुचना देऊन तिची पाठवणी केली.

"" तरुणीबाबत माहिती मिळताच आम्ही तिचा शोध घेतला. तेव्हा, नोकरीच्या आशेने पुण्यात आल्यानंतर ती एकटीच पडल्याचे तिच्याकडून समजले. घटनेचे गांभीर्य ओळखुन तिला तिच्या कुटुंबाकडे तत्काळ सुखरुप पोचविले.''

सुनील जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,

चंदननगर पोलिस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com