esakal | पुणे : गर्दीच्या वेळेत ‘मॉकड्रील’
sakal

बोलून बातमी शोधा

मॉकड्रील घेण्यात आले.

पुणे : गर्दीच्या वेळेत ‘मॉकड्रील’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनुचित घटना घडल्यास त्वरित उपाययोजना कशा कराव्यात, याबाबतचा सराव करण्यासाठी बेलबाग चौक परिसरात पोलिसांनी सोमवारी ‘मॉकड्रील’ करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. गर्दीच्या वेळी सकाळी ‘मॉकड्रील’ केल्याने शिवाजी आणि बाजीराव रस्त्यांच्या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

‘मॉकड्रील’साठी सकाळी अकराच्या सुमारास शिवाजी रस्त्यावर मॉडर्न कॅफे चौकापासून दगडूशेठ हलवार्इ मंदिरापर्यंत, तसेच अप्पा बळवंत चौकाकडून दगडुशेठकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याकाळात वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आला होती. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर कोंडी झाली.

सरावात बाँब शोधक-नाशक पथकातील कर्मचारी, श्वान पथक, शीघ्र कृती दलातील पोलिस कर्मचारी, विशेष शाखेतील पोलिस कर्मचारी तसेच विश्रामबाग-फरासखाना पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा: झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करा’

गणेश उत्सवाच्या काळात अतिरेक्यांनी हल्ला केला, तर त्यांचा सामाना करण्यासाठी अत्यावश्यक तयारीचा भाग म्हणून काय उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी हे ‘मॉकड्रील’ करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ते संपल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी त्वरित खुला करण्यात आला. मात्र, तोपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ‘मॉकड्रील’साठी दगडूशेठ मंदिराचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. या ठिकाणाची वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली होती. मॉकड्रिल संपल्यानंतर रस्ते त्वरित वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग वाहतूक पोलिसांनी दिली.

उत्सवाच्या काळात बंदोबस्त

कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी गेल्या वर्षी पोलिसांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पदपथावर कठडे बांधून भाविकांना ये-जा करण्यासाठी वाट करून दिली होती. तसेच अचानक उसळणारी गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. उत्सवाच्या काळात मध्यभागातील प्रमुख मंडळे, तसेच मानाच्या मंडळाच्या मंडपाच्या परिसरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रमुख मंडळाच्या परिसराची तपासणी बाँब शोधक नाशक पथकाकडून केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

उत्सवाच्या काळात अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गात गर्दी झाल्यास त्याचेही नियोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी ‘मॉकड्रील’ करून बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला.

- मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

loading image
go to top