'...आता फिराल का गाडी घेऊन?' विनाकारण गाडी घेऊन फिरणाऱ्यांसाठी पोलिसांची नामी शक्कल!

Traffic-Police
Traffic-Police

मार्केट यार्ड : कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे शहरातील अनेक परिसर सील करण्यात आल्यानंतरही नागरिक फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अनेकांच्या गाड्या जप्त करत गुन्हे दाखल केले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरीही पुणेकर विनाकारण फिरताना दिसत आहेत.

यावर पुणे पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. विनाकारण गाडी घेऊन फिरणाऱ्यांच्या गाडीच्या चाकातील हवा सोडून देण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडत आहे.

कोरोना या विषाणूला लोकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. परंतु ते होताना दिसत नाही. शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अनेकवेळा समज देऊनही नागरिक सहकार्य करत नाहीत. त्यामुळे पेट्रोलिंग करत असताना आढळून आलेल्या काही लोकांच्या गाडीची हवा सोडून त्यांना समज देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. त्यामुळे यापुढे घरातून बाहेर पडताना काम असेल तर बाहेर पडा, अन्यथा आपल्याही गाडीची हवा सुटू शकते.

सील करण्यात आलेल्या भागात सकाळी १० ते दुपारी १२ या काळात अत्यावश्यक सेवांकरिता नागरिकांना पायी येण्याचे आवाहन केले आहे. तरीही लोक अत्यावश्यक सेवांसाठी घरापासून लांब असलेले ठिकाण निवडून गाड्यांचा वापर करत आहेत. पायी येणाऱ्या नागरिकांना आम्ही सवलत देत आहोत; परंतु गाड्यांचा वापर करणाऱ्या १५० वाहनचालकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जवळपास ४५० वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने ठेवण्यास जागाही अपुरी पडत असल्याचे कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.

पोलिसांनी दिवसभरात जप्त केलेली वाहने नाकाबंदीच्या ठिकाणी लावली जात आहेत. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास ही वाहने संबंधितांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. हे सगळं नागरिकांसाठीच चालू आहे; परंतु काही विशिष्ट मानसिकतेच्या लोकांमुळे सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशी कारवाई झाल्यानंतर विनाकारण नागरिक फिरणार नाहीत, असं मत गायकवाड यांनी व्यक्त केले.

काही लोकांना वारंवार सांगूनही त्यांच्यात सुधारणा होत नाही. त्यामुळे ताबडतोब उपाय म्हणून ही कारवाई केली जात आहे. सील करण्यात आलेल्या भागातील नागरिकांनी गाड्यांचा वापर करू नये, असे सतत सांगून नागरिकांना जागृत केले जात आहे.
- विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com