Pune Pride March : प्राईड मार्चमध्ये सहभागी होणार महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, 'हे' आहे कारण | Pune Pride March Maharashtra Chief Electoral officer Shrikant Deshpande to take part with his staff | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Pride March

Pune Pride March : प्राईड मार्चमध्ये सहभागी होणार महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, 'हे' आहे कारण

ट्रान्सजेंडर समुदायाबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात प्राईड मंथ साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये यानिमित्ताने दर वर्षी प्राईड मार्च आयोजित करण्यात येतो. यावर्षीच्या प्राईड मार्चमध्ये (Pride March) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (Maharashtra CEO) देखील सहभागी होणार आहेत. ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांना मतदार यादीमध्ये येण्याचे आवाहन करण्यासाठी ते या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.

याबाबत ट्रान्सजेंडर समुदायासाठी काम करणाऱ्या संस्थेने आनंद व्यक्त केला आहे. "मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या मार्चमध्ये सहभागी होणं हे अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे." असं मत YUTAK संघटनेचे संस्थापक अनिल उकरंडे यांनी व्यक्त केलं. पुण्यात रविवारी होणारा प्राईड मार्च (Pune Pride March) या संस्थेने आयोजित केला आहे. सायंकाळी चार वाजेपासून जेएम रोडवर हा मार्च सुरू होईल.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त सचिव असणारे श्रीकांत देशपांडे हे या मार्चमध्ये उपस्थित असतील. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. याबाबत बोलताना देशपांडे यांनी आपला उद्देश स्पष्ट केला.

ते म्हणाले, "मुख्य निवडणूक आयोगाने प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक लोकशाही संकल्पनेवर भर दिला आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून ट्रान्सजेंडर समुदायापर्यंत पोहोचणेही आवश्यक आहे". आपण आपल्या कर्मचाऱ्यांसोबत या मोर्चात सहभागी होऊ, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

निवडणूक आयोगाने आतापर्यंत ट्रान्सजेंडर व्यक्तींना मतदार यादीमध्ये घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला ट्रान्सजेंडर समुदायातील गुरू-शिष्य परंपरा लक्षात घेऊन, एखाद्या व्यक्तीची ओळख व्हेरीफाय करण्यासाठी त्याच्या गुरूची मदत घेण्याची मुभा देण्यात आली. मात्र, यामध्ये मग व्हेरिफिकेशनसाठी पैसे घेण्याचं प्रमाण वाढल्याने ही पद्धत मागे घेण्यात आली.

त्यानंतर मग ट्रान्सजेंडर व्यक्तींना आम्ही पत्ता सेल्फ-डिक्लेअर करण्याची मुभा दिली, जे आमचे कर्मचारी व्हेरीफाय करतील. ट्रान्सजेंडर व्यक्तींना मतदार यादीत घेण्यासाठी ही मोहीम आम्ही जेव्हा सुरू केली, तेव्हा सुमारे १००० लोक मतदार यादीत होते. आता ही संख्या पाच हजारांच्या वर गेली आहे. मात्र, महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता, राज्यात लाखो ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत. या सर्वांना मतदार यादीमध्ये घेण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं देशपांडे म्हणाले.

ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या इतर समस्यांबाबतही देशपांडे यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, या व्यक्तींचे प्रश्न अगदी वेगळे असतात. समाजाने या व्यक्तींना लांब ठेवलं आहे, आणि कित्येक ट्रान्सजेंडर व्यक्तींनीही समाजाला लांब ठेवलं आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना मोठ्या समुदायाचा भाग बनवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

या समाजाच्या इतर प्रश्नांबाबत आपण गेल्या वर्षी एक विशेष प्रोग्राम घेतला होता. यामधील आमची कार्यवाही प्रकाशित करून, ती राज्य सरकारने स्थापित केलेल्या एका समितीसमोर मांडण्याचा विचार सध्या सुरू आहे. जेणेकरून ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या इतर समस्यांवरही काम सुरू करता येईल, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.