
पुणे : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘जीतो कनेक्ट’चे उद्घाटन
पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो पुणे) च्या वतीने ‘जीतो कनेक्ट 2022’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने येत्या 6 ते 8 मे दरम्यान ही परिषद पुण्यात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ( ता.6) सकाळी 9.30 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, प्रसिद्ध गायक सोनु निगम, प्रेरणादायी वक्ते विवेक बिंद्रा, गौर गोपाल दास आणि उद्योग व व्यापार क्षेत्राशी निगडीत अनेक मान्यवर वक्त्यांची उपस्थिती लाभणार आहे. या परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित 76 वक्ते सहभागी होणार आहेत. व्यापार, उद्योग, प्रेरणा, फॅशन, अर्थकारण, स्टार्टअप इत्यादी अनेक विषयांवर व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा होणार आहेत. तसेच, ट्रेड फेअर आणि आणि जैन धर्माची परंपरेचे दर्शन घडविणारे जैन पॅव्हेलियन यांचाही यामध्ये समावेश असणार आहे.
जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणे चे अध्यक्ष ओमप्रकाश रांका आणि जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जीतो पुणेचे मुख्य सचिव पंकज कर्नावट, सचिव चेतन भंडारी, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र झोनचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जीतो अपेक्सचे संचालक रमेश गांधी, इंदर छाजेड, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र झोन जेएटीएफचे अध्यक्ष इंदर जैन, अजय मेहता, हितेश शहा, जीतो युथ विंग पुणेचे अध्यक्ष गौरव नहार आदी मान्यवर उपस्थित होते.
एकत्र येऊन उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या दृष्टीकोनातून जीतो संस्था काम करते. जीतो पुणे च्या वतीने 2016 मध्ये जीतो कनेक्टचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. ‘जीतो कनेक्ट 2022’ ही मागच्यापेक्षाही मोठी परिषद असणार आहे. पाच लाखाहून अधिक उद्योजक व व्यापाऱ्यांची उपस्थिती यावेळी अपेक्षित आहे. पुणे शहरातील गंगाधाम चौक ते कात्रज कोंढवा रस्त्यावरील राजयोग लॉन्स येथे ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. सुमारे 15 लाख चौरस हेक्टर जागेत परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. 40 हजार चौरस फुटांत जैन पॅव्हेलियन असणार आहे. याठिकाणी 6500 बैठक व्यवस्था असलेले एक मुख्य सभागृह आणि 600 बैठक व्यवस्था असलेले तीन सभागृह असणार आहेत. मुख्य सभागृहात उद्घाटन व समारोप कार्यक्रमाबरोबरच जगभरातून आलेल्या महत्वाच्या व्याख्यातांची व्याख्याने होणार आहेत. तर, इतर तीन सभागृहात विविध विषयांवरील कार्यशाळा व चर्चासत्र होणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत बीटुबी पॅव्हेलियन, स्मार्ट टेक पॅव्हेलियन, जीतो बिझनेस कोर्ट पॅव्हेलियन, लाईफस्टाईल अॅण्ड ज्वेलरी पॅव्हेलियन, एज्युकेशन अॅण्ड सायन्स पार्क आणि बीटुसी पॅव्हेलियन असणार आहे. या परिषदेत होणाऱ्या प्रदर्शनात एक हजारांहून अधिक कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या एक लाखाहून अधिक वस्तु व सेवांचा सहभाग असणार आहे. तसेच, या परिषदेसाठी मोफत प्रवेश असून 5 लाखाहून अधिक उद्योजक व व्यापारी याठिकाणी येतील असा अंदाज आहे. येणाऱ्या प्रत्येकासाठी व्यवस्था व्हावी म्हणून गाडी पार्किंगची 2.25 लाख चौरस फूट जागेत व्यवस्था करण्यात आली आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य व योगदान दिले आहे. प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले आहे. कोरोनाच्या काळात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे. या परिषदेमध्ये होत असलेल्या कार्यक्रमांना प्रवेश मोफत आहे. मात्र, जागेच मर्यादा लक्षात घेता त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नाव
नोंदणी connect2022.jito.org या संकेतस्थळावर जाऊन करता येईल.
Web Title: Pune Prime Minister Modi Inauguration Jito Connect
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..