पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या पदरी उपेक्षाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशातील नागरिकांची संख्या पुणे परिसरात वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात गाड्यांची संख्या पुरेशी नाही.  
- दीपकसिंग ठाकूर, पुणे- दरभंगा रेल्वे प्रवासी संघ  

उत्तर प्रदेश, बिहारसाठी पुण्यातून नव्या गाड्या सुरू व्हाव्यात, यासाठी निवेदने दिली होती. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. पुणे- दरभंगा ही गाडी तरी आठवड्यातून किमान २- ३ वेळा सुरू व्हावी. 
- अजयकुमार मिश्रा, रेल्वे प्रवासी संघ 

रेल्वेचे खासगीकरण करताना प्रवाशांची गर्दी आहे, त्या मार्गावर तरी त्यांना सुविधा द्यायला हव्यात. मात्र त्याचीही कोणी दखल घेत नाही. रेल्वेचे नेमके नियोजन आणि उद्दिष्ट काय आहे, याबद्दलच शंका येते. 
- विकास देशपांडे, पुणे - दौंड प्रवासी संघ

पुणे - केंद्रीय अर्थसंकल्पात यंदाही महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधीही या विषयांमध्ये लक्ष घालत नसल्याने पुण्यातील प्रवाशांच्या मागण्यांकडे रेल्वेचे अधिकारी काणाडोळा करतात, अशी भावना संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. यामुळेच अर्थसंकल्पात महाराष्ट्राची पदरी उपेक्षा आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प काल (शनिवारी) सादर केला. त्यात रेल्वेच्याही अर्थसंकल्पाचा समावेश होता. 

उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आदी भागांतील सुमारे ४ ते ५ लाख नागरिक शिक्षण, व्यवसाय, नोकरी आदी विविध कारणांमुळे पुण्यात राहतात. चंडीगड, लखनौ, गोरखपूर तसेच दरभंगासाठी रोज गाडी असावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. पुणे- पाटणा दररोज गाडी असली, तरी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. 

पुणे : भरधाव डंपरने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार

लांबपल्ल्याच्या या गाड्या आठवड्यातून एकदाच आहेत. त्यांची वारंवारता वाढवून त्या किमान दोन वेळा तरी केल्या पाहिजेत, अशी मागणी प्रवासी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. परंतु त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतलेली नाही. 

गाड्यांसाठीची प्रतीक्षा यादीही अन्य गाड्यांच्या तुलनेत जास्त असते. एवढेच नव्हे, तर पुणे -दौंडदरम्यान रेल्वेगाडी सुरू करावी, दौंड- लोणावळा लोकल सुरू करावी, या मागण्यांकडेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. पुणे विभागातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्या लोकप्रतिनिधींकडून लावून धरल्या जात नाहीत. परिणामी, रेल्वेचे अधिकारीही त्यांची दखल घेत नाहीत, अशीही प्रवासी संघटनांची तक्रार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Railway passengers are ignored