पुणे परिसरात आज पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

मॉन्सूनचा परतीचा प्रवास गुरुवारपासून
पश्‍चिम राजस्थानसह उत्तरेकडील राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. हवामान कोरडे झाल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीसाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. गुरुवार (ता. १०) पासून मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्‍यता आहे. सोमवार (ता. १४) पर्यंत देशाच्या वायव्य आणि मध्य भारतातील बहुतांश भागातून मॉन्सून काढता पाय घेईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. राज्यातून साधारणतः २० ऑक्‍टोबरपर्यंत मॉन्सून परतण्याचे संकेत आहेत.

पुणे - मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने राज्यात वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या सरी पडत असल्याने मराठवाड्यातील बहुतांश भागांत तापमानात घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मात्र ‘ऑक्‍टोबर हीट’ जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजयादशमीच्या दिवशी (ता. ८) वादळी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तेथील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला. त्याचवेळी कोकणातील कमाल तापमान वाढले होते. मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. त्याचवेळी ढगाळ वातावरणामुळेही कमाल तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव येथे ३४.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

विजयादशमीला पुणे शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. शिवाजीनगर येथील वेधशाळेत सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ ते ७ ऑक्‍टोबरदरम्यान शहरात ६०.५ मिलिमीटर पाऊस पडला. लोहगाव येथे ३५.६; तर पाषाण येथे ६९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rain Monsoon Environment