मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झोप; जाणून घ्या १४ ऑक्टेबरच्या रात्री कुठं काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

ट्रेझर पार्क सोसायटीमध्ये मागील वर्षी हजारो गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी पावसाचा जोर वाढल्याचे दिसताच गाड्या बाहेर काढून ठेवल्या होत्या.

पुणे : शहर आणि परिसरातील काही भागात बुधवारी दुपारपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली होती. मात्र, रात्री ८ नंतर पावसाचा जोर वाढत गेला. यामुळे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचून राहिले होते. काही भागात नागरिकांच्या घरातही पाणी शिरले होते. तर वीजही अधूनमधून गायब होत होती. 

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळील तलाव रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भरून वाहू लागला. तसेच अंबिल ओढ्यालाही पूर आला होता. सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर या भागात रस्त्यावरून जोरदार पाणी वाहत होते. आंबिल ओढ्याशेजारील गुरुराज सोसायटीमधील नागरिक रस्त्यावर आले होते. मागील वर्षी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही ना, या काळजीने त्यांची झोप उडाली होती.

Pune Rain : खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार; मुठा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!

घरांमध्ये शिरले पाणी
लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, मार्केटयार्ड येथील आनंदनगर, सोमनाथनगर, लालबहादूर शास्त्री कॉलनी, पाषाण, सूस रस्ता, सहकारनगर, संतनगर, अण्णा भाऊ साठे नगर येथील वस्तीमध्ये पाणी शिरले. तसेच लक्ष्मी नगर, शिवदर्शन, शाहू वसाहत, शंकर महाराज वसाहत, आनंद नगर, संभाजी नगर, शंकर महाराज वसाहत या भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच सोसायटीच्या पार्किंगमध्येही पाणी शिरले होते. ट्रेझर पार्क सोसायटीमध्ये मागील वर्षी हजारो गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी पावसाचा जोर वाढल्याचे दिसताच गाड्या बाहेर काढून ठेवल्या होत्या. महर्षीनगर, गुलटेकडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने इंदिरानगर, डायस प्लॉट, खिलारे वसाहत, मार्केटयार्ड भागातील आंबेडकरनगरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच अनेक वाहनेही वाहून गेली होती. 

Pune Rain Live Updates : पुण्यात पावसाने दैना, घरांमध्ये शिरले पाणी; सिंहगड रोड बंद

रस्ते जलमय
मुसळधार पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते. गजानन महाराज मठ रस्ता, सिंहगड रस्ता परिसरातील आनंद नगर, संतोष हॉलजवळील डिव्हायडरवरून पाणी वाहत असल्यामुळे विठ्ठलवाडीपासूनचा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच अरण्येश्वर पूलावरून पाणी वाहू लागल्याने तेथील वाहतुकही बंद करण्यात आली होती. रस्त्यांवर पाणी साचून राहिल्याने दुचाकी चालक आपली वाहने ढकलत घेऊन जाताना दिसत होते. 

किरकटवाडीतील मावळे आळी येथे दहा-बारा घरांना पाण्याने वेढा टाकला होता. लोक टेरेसवर अडकून पडले होते. त्यावेळी पोलिस प्रशासन आणि स्थानिकांनी भिंत पाडून पाण्याला वाट मोकळी करून दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune rain updates 14th October flood situation and road traffic