Pune Rains :...अन्‌ त्याने घेतला जगाचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

 घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला.

पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने रस्सीच्या साह्याने पत्नी अन्‌ दोन मुलांना वाचविले. मात्र तो स्वतः बाहेर पडू लागला, त्याचवेळी पाण्याचा लोंढा आला अन्‌ त्याला मृत्यूच्या कवेत  घेऊन गेला.

पुरात दहा ते पंधरा जणांना वाचवून माघारी परतेपर्यंत रस्त्यावरून आलेला पाण्याचा लोंढा धर्मानाथच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये आला. पुन्हा एका आव्हानाचा सामना करत स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलूने सुरवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलीकडच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. 

गोलूने टाकलेल्या रस्सीला पकडण्याचा प्रयत्न धर्मानाथने केला. मात्र ही धडपड व्यर्थ ठरली. कारण पाण्याचा जोरदार प्रवाह धर्मानाथला आपल्या कवेत घेऊन गेला. बुधवारची मध्यरात्र अन्‌ गुरुवारची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली. 

अखेर सकाळी साडेअकरा वाजता घरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या लुल्लानगर परिसरात पाण्यामधील चिखलात धर्मानाथचा मृतदेह सापडला.  

उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह पुण्यात
मूळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा २५ वर्षीय धर्मानाथ व त्याचा भाऊ गोलूप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसू आणि भाऊ गोलुप्रसाद राहत होते. धर्मानाथ बिगारी काम करत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains Dharmanath Kumar death

टॅग्स