Pune Rains : ओढे-नाले वाहू द्या! (video)

मोहन साखळकर
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

वाढत्या नागरीकरणामुळे पावसाचे पाणी नैसर्गिक स्रोतांद्वारे वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे, त्यामुळे पुन्हा धुवाधार पाऊस झाल्यास बुधवारसारखी परिस्थिती पुणे शहरात कोठेही उद्‌भवू शकते. भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी पावसाचे पाणी वाहून नेणारे ओढे, नाले अशा नैसर्गिक स्रोतांना पुरेशी जागा ठेवणे गरजेचे आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे पावसाचे पाणी नैसर्गिक स्रोतांद्वारे वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे, त्यामुळे पुन्हा धुवाधार पाऊस झाल्यास बुधवारसारखी परिस्थिती पुणे शहरात कोठेही उद्‌भवू शकते. भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी पावसाचे पाणी वाहून नेणारे ओढे, नाले अशा नैसर्गिक स्रोतांना पुरेशी जागा ठेवणे गरजेचे आहे.

बुधवारी ज्या परिसरात नागरी वस्ती, सोसायट्यांत पाणी शिरले तो कात्रज, अरण्येश्वर, पद्मावती, सहकारनगर, वारजे आदी भाग डोंगर उतारावर आहे. उतारावर पाण्याचा वेग प्रचंड असतो. या पाण्याला नैसर्गिक वाट न मिळाल्यास ते पाणी अन्यत्र जागा मिळेल तेथे वळते, त्यामुळे कालही पावसाच्या पाण्याला नैसर्गिक वाट न मिळाल्याने ते वाट मिळेल तेथे घुसले. 

डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणावर बैठी घरे आणि नव्याने उभारलेल्या इमारती आहेत. उदरनिर्वाहासाठी राज्याच्या अन्य भागातून, परप्रांतातून मोठ्या संख्येने लोक येतात. यातील अनेकांना येथील घराच्या किमती परवडणाऱ्या नसल्याने ते मोकळ्या जागेवर किंवा ओढे, नाल्याच्या कडेला झोपडीवजा घर बांधून राहतात. त्यासाठी ओढे, नाल्यांत भराव टाकून त्यांची रुंदी कमी केली जाते. साहजिकच ते अरुंद होऊन पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर काही ठिकाणी वाढत्या नागरीकरणामुळे अशी अतिक्रमणे आणि रहिवासी संकुलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ, काँक्रिटीकरण, सिमेंटचे ब्लॉकचे प्रमाण वाढल्याने पाणी जमिनीत मुरण्यास अडचण निर्माण होत आहे. 

पाणी योग्य पद्धतीने वाहून जावे यासाठी उपाययोजना करण्यासाठी हायड्रॉलॉजिक मॅपिंग करावे लागते, ते पुणे महापालिकेने केले आहे. काही ठिकाणी त्याची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली आहे. मात्र, ती आणखी वेगाने होणे गरजेचे आहे. भरवस्तीत पुरासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि दुर्घटना घडू नयेत यासाठी ओढे, नाल्यांवर अतिक्रमणे होणार नाहीत, त्यांची रुंदी कमी होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. 

त्याचबरोबर आपल्या परिसरातील हे नैसर्गिक स्रोत वेळच्या वेळी स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सांगितले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगला चालना देऊन पावसाच्या पाण्याला योग्य पद्धतीने पुरेशी वाट करून देणसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासन आणि नागरिकांनी मिळून एकत्रितपणे विचार  करून अशा उपाययोजना केल्यास अशा दुर्घटना टळू शकतील.

मोहन साखळकर, ज्येष्ठ सिव्हिल इंजिनिअर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains Mohan Sakhalkar interview

टॅग्स