Pune Rains : पीएमपीचालकाचा दोन तास तडफडून मृत्यू (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मेट्रोच्या क्रेन येण्यासही विलंब
पिंपळाचे झाड खूप मोठे असल्याने अग्निशामक दलाला ते बाहेर काढणे अशक्‍य झाले. त्यामुळे स्वारगेट येथून मेट्रोच्या क्रेन मागविण्यात आल्या. वाहतूक कोंडीमुळे या क्रेन येण्यास वेळ लागला. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडाच्या फांद्या तोडून रस्ता रिकामा करण्याचा प्रयत्न केला. रात्री साडेनऊच्या सुमारास तेथे क्रेन आल्यानंतर झाड बाजूला काढून त्यातून निवंगुणे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

स्वारगेट  - रस्त्यात बंद पडलेल्या पीएमपी बस बाजूला काढण्याचे काम करणाऱ्या पीएमपी चालकावरच बुधवारी काळाने झडप घातली. सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात ग्राहकपेठेसमोरील पिंपळाचे झाड पीएमपीच्या सर्व्हिस व्हॅनवर कोसळले. ते बाजूला काढणे अशक्‍य झाल्याने अन्‌ भरटिळक रस्त्यावर तब्बल दोन तास वेळेवर मदत मिळू न शकल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या चालकाचा अखेर तडफडून मृत्यू झाला. विजय ऊर्फ बंडू निवंगुणे असे त्यांचे नाव आहे.

निवंगुणे हे ब्रेक डाउन झालेल्या व रस्त्यात बंद पडलेल्या पीएमपीच्या गाड्या ओढून नेण्याचे काम करतात. ग्राहकपेठेच्या पुढे स्वारगेटच्या दिशेने जाणारी पीएमपी बस बंद पडली होती. ही बस ओढून नेण्यासाठी निवंगुणे आणि त्यांचे दोन सहकारी सर्व्हिस व्हॅन घेऊन तेथे जात होते. ही बस स. प. महाविद्यालय चौकातून वळत यू टर्न घेण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी ग्राहकपेठेच्या समोर असलेले पिंपळाचे झाड पीएमपीवर कोसळले. तसेच एक रिक्षा व टेम्पोही त्याखाली अडकला. या वेळी बसमधील दोघेजण वेळीच उड्या मारून निघून गेले. मात्र, निवंगुणे तब्बल दोन तास अडकून पडले. त्यांनी बाहेर पडण्यासाठी बराच प्रयत्न केला. 

कालांतराने नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना शक्‍य झाले नाही. शेवटी अग्निशामक दलाचे जवान तेथे आले; पण हे झाड खूप मोठे असल्याने त्यांचेही प्रयत्न व्यर्थ ठरले. यामध्ये बराच वेळ गेल्याने निवंगुणे यांचा मृत्यू झाला.

मी सर्व माहिती घेतली आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासन व अग्निशामन दल आलेले आहे. मदतीचे काम सुरू असून, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधणार आहे.
- नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains PMP Bus Driver death by tree collapse in rain