#PuneTraffic पुण्याची वाहतुकीची कोंडी फुटणार कधी? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणेकरांनो, बोलते व्हा ....
पावसाने झोडपले, खड्ड्यांनी सतावले, कोंडीने अडविले, पोलिसांनी फटकारले तरी भरडले जातो पुणेकरच.... आता वाहतुकीच्या कोंडीबाबत पुणेकरांनीच आवाज उठविला पाहिजे, तर मग सांगा तुमचा अनुभव ‘सकाळला’

आपल्या सूचना, उपाय सुचवा - फेसबुक ट्विटर, इन्स्टाग्रामवर 

वाहतुकीच्या कोंडीमुळे वाघोलीमध्ये सोमवारी एका शाळेला चक्क सुटी द्यावी लागली. पुण्यातील वाहतुकीच्या कोंडीची तीव्रता अधोरेखित करणारी ही प्रातिनिधिक घटना आहे. चारही दिशांची उपनगरे आणि शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी पुणेकर गेल्या पंधरा दिवसांपासून अनुभवत आहेत. दुर्दैवाने त्यासाठीच्या उपाययोजनांचा ‘अजेंडा’ ना महापालिकेकडे आहे ना, पोलिसांकडे! त्यातच खड्डे, बंद पडणाऱ्या पीएमपीच्या बसगाड्या, महापालिकेची सुरू असलेली अर्धवट कामे, रस्ते-चौकांतील अतिक्रमणे आदींमुळे या कोंडीत भरच पडत आहे. त्याचा फटका पुणेकरांना रोज बसत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर पुणे खऱ्या अर्थाने ‘जॅम’ होईल ...

कोथरूडमध्ये भुसारी कॉलनीमध्ये मी राहतो. राजगुरुनगरला (ता. खेड) मला रोज प्रवास करावा लागतो. घरातून सकाळी सात-साडेसातला निघालो तरी चाकण ओलांडण्यासाठी मला दहा वाजतात अन्‌ राजगुरुनगरला पोचायला साडेदहा वाजतात. संध्याकाळी चार वाजता निघालो तरी घरी पोचायला आठ-नऊ वाजतात. ट्रॅफिक जॅममुळे हा प्रवास नकोसा झाला आहे; पण नाईलाज आहे. चाकण ओलांडण्यासाठी आता तीन तासही कमी पडतात.
डॉ. राहुल जोशी, नेत्ररोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी 

पुना हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला पाहायला दुपारी १२ ते १२. ३० दरम्यान जायचे होते. कोथरूडच्या भुसारी कॉलनीतून सकाळी १० वाजता निघाले. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे पौड रस्त्यावर वाहनांची प्रचंड रांग लागली होती. साडेबारा वाजले तरी दशभुजा गणपतीच्या पुढे जाऊ शकत नव्हते. अखेर पेशंटला फोन केला अन्‌ नंतरची अपॉइंटमेंट दिली, अन्‌ एक-दीड वाजता वाटेतूनच घरी परतले.  
- डॉ. पल्लवी जोशी,  स्त्रीरोगतज्ज्ञ,

आजचे दृश्‍य 
पदपथ, सायकल मार्ग अशा मिळेल तेथून वाट काढणारे दुचाकी चालक, रस्त्यांमध्ये कर्णकर्कश हॉर्न वाजवत इंच-इंच पुढे जाणारे चार चाकी वाहनांमधील प्रवासी आणि दोन वाहनांच्या मधल्या जागेतून अंग चोरत, अक्षरशः जीव मुठीत धरून कसाबसा रस्ता ओलांडणारे पादचारी, अशी स्थिती मंगळवारी सकाळी पुणेकरांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनुभवली. 

स्मार्टफोनच्या ‘गुगल मॅप’वर वाहतुकीची स्थिती बघूनच पुणेकर सध्या घरातून बाहेर पडतात. आज सकाळी साडेनऊला उपनगर आणि शहर यांना जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी असल्याचे हा नकाशा दाखवत होता. दुपारी दोनपर्यंत या स्थितीत थोडीफार सुधारणा झाली. मात्र, संध्याकाळी पाचनंतर सकाळसारखीच स्थिती पूर्ववत झाली.  

वाहतुकीची कोंडी होण्याची कारणे
महापालिकेची सुरू असलेली कामे
विजेच्या लंपडावामुळे अनेक वाहतूक नियंत्रक दिवे बंद
वाहतूक नियमनापेक्षा पोलिसांचा कारवाईवर भर 
शहरातील प्रमुख चौकांत पथारी, फेरीवाल्यांची अतिक्रमणे 
रस्त्यात बंद पडणाऱ्या पीएमपीच्या बस 
अनेक ठिकाणी पडलेले खड्डे 

पुणेकरांनो, बोलते व्हा ....
पावसाने झोडपले, खड्ड्यांनी सतावले, कोंडीने अडविले, पोलिसांनी फटकारले तरी भरडले जातो पुणेकरच.... आता वाहतुकीच्या कोंडीबाबत पुणेकरांनीच आवाज उठविला पाहिजे, तर मग सांगा तुमचा अनुभव ‘सकाळला’

आपल्या सूचना, उपाय सुचवा - फेसबुक ट्विटर, इन्स्टाग्रामवर 

Web Title: Pune residents facing traffic conjunction everyday