Pune : 'सहकार्या’साठी विरोधी नगरसेवकांना एक कोटीचे बक्षीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune : 'सहकार्या’साठी विरोधी नगरसेवकांना एक कोटीचे बक्षीस

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे ः पुणे महापालिकेत सोमवारी (ता. २२) झालेल्या मुख्यसभेत सत्ताधारी भाजपला ‘एटीएमएस’सह इतर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षाने ‘सहकार्य’ केल्याने आज (मंगळवारी) या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देऊन बक्षीस देण्यात आले. यासाठी वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत महामार्गासाठी (एचसीएमटीआर) अंदाजपत्रकात असलेल्या तरतुदीतून ६४ कोटी रुपये वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या मुख्यसभेत वर्गीकरणाचे प्रस्ताव येत असताना त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी यासह आक्षेप घेतला. महापालिका प्रशासनाने ज्या कामासाठी तरतूद केली आहे, त्यासाठीचा निधी एका नगरसेवकास कसा काय वर्गीकरण केला जात आहे? असा प्रश्‍न विरोधकांनी विचारला होता. यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना उत्तर दिले नव्हते, पण विरोधकांच्या आसनाजवळ जाऊन बराच वेळ चर्चा करून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये भाजपला यश आल्यानंतर या वर्गीकरणास विरोध झालाच नाही, शिवाय एटीएमएस, ११ गावातील मैलाशुद्धीकरण प्रकल्प, स्मार्ट सिटीचे विषय मार्गी लागले होते.

स्थायी समितीची बैठक आज सकाळी सुरू झाल्यानंतर आयत्यावेळी विरोधीपक्षातर्फे ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पासाठी तरतूद असलेल्या ७० कोटी रुपयांपैकी ६४ कोटी रुपये वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे यासह इतर विरोधी पक्षाच्या ६४ नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये त्यांच्या प्रभागातील कामासाठी देण्यात आलेले आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एकाही नगरसेवकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

हेही वाचा: 'अब्बाजान, चच्चाजानच्या लोकांनी लक्षात ठेवावं...', योगींचा ओवैसींना इशारा

‘‘विरोधी पक्षाच्या ६४ नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामे करण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याता आला आहे. हा निधी ‘एचसीएमटीआर’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. भाजपच्या नगरसेवकांसाठी निधी दिलेला नाही. भविष्यात विचार केला जाईल.’’

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

‘‘मुख्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर होत होते, पण विरोधीपक्षाच्या नगरसेवकांकडे निधीच नाही. हा विषय सभागृहनेत्यांकडे मांडल्यानंतर त्यांनी निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे आज विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून दिला असून, यामुळे प्रभागात विकास कामे करता येणार आहेत. सभागृहात केलेल्या सहकार्याचा आणि हा निधी मंजूर करण्याचा काही संबंध नाही.’’

- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या

loading image
go to top