पुणे : दौंड ते बारामती मार्गावर प्रवाशांची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Auto Rikshaw

पुणे : दौंड ते बारामती मार्गावर प्रवाशांची लूट

दौंड (पुणे) : दौंड ते बारामती दरम्यान प्रवासाकरिता सहा सीटर रिक्षाचालकांकडून थेट दोनशे रूपये आकारणी करून लूट केली जात आहे. एका रिक्षात तब्बल दहा ते बारा प्रवासी कोंबून ही वाहतूक सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी दौंड एसटी आगारातील १६३ कर्मचारी ८ नोव्हेंबर पासून संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे नाईलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दौंड - कुरकुंभ - बारामती या ४० किलोमीटर अंतरासाठी एसटीचे तिकिट दौंड आगारातून साठ तर रोटरी सर्कल येथून पंचावन्न रूपये असे आहे. मात्र एसटी कर्मचार्यांचा संपा सुरू असल्याने या मार्गावरील सहा सीटर रिक्षा व टमटम चालकांकडून प्रत्येकी दोनशे रूपये आकारून अडवणूक केली जात आहे.

हेही वाचा: मुंबई मनपाला अध्यादेशाची प्रतीक्षा; निवडणूक लांबणीवर पडणार?

राज्य शासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिलेली आहे परंतु दौंड येथील वर्दीवरील वाहनचालक एसटीच्या थांब्यांवर खासगी वाहनांना प्रवासी घेऊ देत नाहीत. दौंड - पाटस आणि दौंड - काष्टी (ता. श्रीगोंदा) मार्गावर देखील अडवणूक होत आहे.

बारामती येथील सत्र न्यायालय, शिक्षण संस्था, एमआयडीसी, कृषी औजारे दुकाने, रोपे विक्री केंद्र, दूध संस्था, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, विविध कारखाने, कार्यालये आणि वाणिज्य प्रतिष्ठाणांमध्ये जाण्याकरिता नागरिकांना दररोज दौंड येथून ये - जा करावी लागते. दौंड - बारामती - दौंड रेल्वे सेवा २२ मार्च २०२० पासून बंद आहे आणि एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

आर्थिक अडवणूक करणार्या रिक्षाचालकांवर बारामती येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

loading image
go to top